येशूजन्माच्या देखाव्यांतून सामाजिक प्रश्नांवर प्रबोधन

मिल्टन सौदिया, वसई

वसईत नाताळ सणाचे पडघम वाजू लागले आहेत. डिसेंबरच्या पहिल्या रविवारी सर्व चर्चमधून जांभळ्या मेणबत्तीच्या प्रज्ज्वलनातून नाताळ येत असल्याचा संदेश देण्यात आल्यानंतर आता नाताळ सणाचे प्रमुख वैशिष्टय़ असलेले नाताळ गोठे, अर्थात येशूच्या जन्माचे देखावे साकारण्याची जोरदार तयारी सुरू झाली आहे. या देखाव्यांच्या माध्यमातून स्थानिक तरुणांच्या सर्जनशीलतेला चालना देण्याची आणि विविध सामाजिक प्रश्नांकडे लक्ष वेधून त्यावर प्रबोधन करण्याची मोठी परंपरा वसईत आढळून येते.

येशूचा जन्म गाईच्या गोठय़ात झाला होता. या गोठय़ाच्या व येशूजन्म काळातील ऐतिहासिक संदर्भाच्या प्रतिकृती या देखाव्याच्या माध्यमातून साकारल्या जातात. यामध्ये साधारणत बेथलेहेम गावाची पाश्र्वभूमी, डोंगरदऱ्या, नदी, गवताळ भाग साकारला जातो. लाकडी गोठा आणि त्यात बाळ येशू, त्याचे आईवडील मारिया आणि योसेफ तसेच गाई-म्हशी साकारल्या जातात. त्याशिवाय ताऱ्यांच्या माध्यमातून येशूबाळाला शोधत आलेले तीन राजे दाखवण्यात येतात. येशूच्या जन्माची सुवार्ता देवदूतांनी मेंढपाळांना सांगितली होती. त्याचवेळी मेंढपाळ बाळयेशूला पाहण्यास आले होते, अशी कथा बायबलमध्ये आहे. त्यामुळे नाताळ गोठय़ांमध्ये मेंढय़ा व मेंढपाळ यांच्या प्रतिकृती साकारण्यात येतात.

नाताळ गोठय़ांबाबत अधिक माहिती देताना वसई धर्मप्रांताच्या शिक्षण विभागाचे संचालक फादर थॉमस लोपीस म्हणाले, या नाताळ गोठय़ातून येशूचे पालक असणाऱ्या मारिया आणि योसेफ यांचे वात्सल्यपूर्ण पालकत्व दिसते. या देखाव्यातील तीन राजे ज्ञानी लोकांचे प्रतीक आहेत. ते ताऱ्याच्या दिशेने शोध घेत येशूबाळाच्या दर्शनाला आले. म्हणजेच त्यांच्या ठायी संशोधनवृत्ती आहे. येशूच्या जन्मावेळी आजूबाजूचे मेंढपाळ जमले. त्यांच्या ठायी कुतूहल आहे. येशूचा जन्म गोठय़ात झाला ही बाब आयुष्यात साधेपणा राखण्याचा संदेश देते. देवदूताने येशूजन्माची सुवार्ता सांगितली, यातून समाजात सकारात्मकता पोहोचवण्याचा संदेश मिळतो.

पोप यांचे प्रथमच परिपत्रक

नाताळ गोठय़ांचे यावेळचे वैशिष्टय़ म्हणजे प्रथमच ख्रिस्ती धर्मियांचे सर्वोच्च पीठ असलेल्या व्हॅटिकनमधून येशू जन्माचे देखावे साकारण्याबाबत पोप यांचे ‘अ‍ॅडमिरेबल सिग्नम’ नावाचे परिपत्रक आले आहे. पोप फ्रान्सिस यांनी या परिपत्रकातून नाताळ गोठय़ाचा अर्थ आणि महत्त्व स्पष्ट केले आहे. नाताळ गोठय़ातील दृश्य माणसाला देवाच्या गरिबीला अनुभवण्यासाठी आणि स्पर्श करण्यासाठी आमंत्रित करते. बेथलेहेमपासून ते कालवरीपर्यंत येशूच्या नम्रतेचा, गरिबीचा व स्वार्थत्यागाचा मार्ग अवलंबण्यास बोलाविते, असे स्पष्ट करून नाताळ गोठय़ातील प्रत्येक पात्राचे महत्त्व या परिपत्रकातून विषद करण्यात आले आहे.

सामाजिक प्रबोधन

गेल्या काही वर्षांत नाताळ गोठय़ांचे देखावे सामाजिक प्रबोधनावर भर देत आहेत. पर्यावरण संवर्धन, स्त्री-भ्रूणहत्या, कौटुंबिक सुसंवाद, युवकांमधील वाढती व्यसनाधीनता याबाबत सामाजिक प्रबोधन या देखाव्यांमधून करण्यात आले. दहशतवादी हल्ले, पूरस्थिती यांसारखे विषयही यांतून मांडण्यात आले आहे. नाताळ गोठय़ांमधून तरुणांच्या सर्जनशीलतेला चालना मिळते, अशी माहिती गास येथील लहान सरगोडी सामाजिक संस्थेचे जॉय फरगोज यांनी दिली. अलीकडच्या काळात गोठय़ाच्या संकल्पनेत आमूलाग्र बदल झाला आहे. गोठय़ांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर वाढला असून चलचित्रे, संगीत, लेझर यांचा वापर होऊ लागला आहे, अशी माहितीही फरगोज यांनी दिली.

नाताळ गोठय़ांचा इतिहास

नाताळ सणानिमित्त उभारण्यात येणाऱ्या नाताळ गोठय़ांना अपरंपार महत्त्व आहे. संत फ्रान्सिस असिसिकर यांनी १२२३ मध्ये नाताळ गोठय़ाची परंपरा सुरू केली. त्यांनी जिवंत पात्रांद्वारे येशूचा जन्मसोहळा उभा केला. उंट, मेंढय़ा, तीन राजे, देवदूत, मारिया आणि तिचे छोटे बाळ या जिवंत पात्रांद्वारे त्यांना येशू जन्माची कथा लोकांपर्यंत पोहोचवली होती. कालांतराने युरोपमध्ये ख्रिश्चन धर्माचा प्रसार झाला आणि जिवंत पात्रांच्या जागी मूर्ती बसवल्या जाऊ  लागल्या. आज जागोजागी उभारण्यात येणाऱ्या देखाव्यांमध्ये अशा सुंदर मूर्ती आपण पाहतो. या देखाव्याचे चिंतन करता मानवी जीवनाला उपयुक्त असे अनेक संदेश मिळतात, असे बायबलचे अभ्यास फादर डॉ. रॉबर्ट डिसोजा यांनी सांगितले.