उत्तर वसईत रविवारी भव्य कार्निवल

२४ डिसेंबरच्या मध्यरात्री साजरा होणाऱ्या नाताळची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. रविवारी (२२ डिसेंबर) उत्तर वसईत भव्य ख्रिसमस कार्निवलचे आयोजन करण्यात आले आहे. नालासोपारा पश्चिमेकडील गास येथील लहान सरगोडी सामाजिक संस्थेने हा कार्निवल आयोजित केला आहे. ‘महिला सक्षमीकरण आणि राष्ट्रीय एकात्मता’ याबद्दलचा संदेश कार्निवलच्या माध्यमातून देण्यात येणार आहे.

वसई-विरार परिसरात काही वर्षांपासून नाताळ हा निव्वळ धार्मिक सण म्हणून न  राहता पर्यावरण प्रबोधन, संस्कृती संवर्धन, सर्वधर्म सुसंवाद आणि समन्वय या अंगाने साजरा होऊ लागला आहे. त्यात सर्वधर्मीय लोक सहभागी होत आहेत. नाताळच्या तयारीनिमित्त वसईत भव्य शोभायात्रा काढल्या जातात. स्थानिक संस्कृतीचे दर्शन, विविध धर्मियांची सांस्कृतिक वैशिष्टय़े व ख्रिस्तविचार दर्शविणारे फलक, लेझीम तसेच बैलगाडी, टांगे, घोडे, शेळया-मेंढय़ा यासह  पारंपरिक वेशातील महिला व पुरुष, मुले मिरवणुकीत सहभागी होतात. लहान सरगोडी येथून संध्याकाळी ६ वाजता मिरवणूक सुरू होईल. ही मिरवणूक पाहण्यासाठी नागरिक दुतर्फा गर्दी करतात.

नाताळसारखा प्रेमाचा सण फक्त ख्रिस्ती धर्मीयांपुरता मर्यादित न राहता या सणाच्या माध्यमातून सर्व जातीधर्मीयांमध्ये सलोखा निर्माण व्हावा आणि सद्यस्थितीतील सामाजिक विषयावर प्रबोधन व्हावे, या हेतूने आम्ही ही मिरवणूक काढतो. -जॉय फरगोज, कार्यकर्ता, लहान सरगोडी सामाजिक संस्था