पाणीपुरी, भेळपुरी, वडापाव, भजी असे दोनवेळच्या जेवणादरम्यानच्या वेळेत जिभेचे चोचले पुरवणारे पदार्थ चाखायची सवय असलेल्यांना या पदार्थापेक्षा काहीतरी हटके असलेल्या पदार्थाची लज्जत घ्यायची असेल तर त्यांनी भाईंदर पश्चिम येथे काही दिवसांपूर्वीच सुरू झालेल्या ‘चटनी चाट लीग’ या दुकानाला आवर्जून भेट द्यावी. ‘दिल्ली बटाटा’, ‘मोनॅको चीज बाइट्स’, ‘इटालियन पकोडा’, ‘देशी नाचोज’ अशा विविध प्रकारच्या डिशच्या नावानेच आपली उत्सुकता चाळवली जाते.

प्रणव चावंडे, ब्रेंडन परेरा आणि विन्सन्ट चाको या तीन मित्रांनी हा व्यवसाय सुरू केला आहे. हे तिघेही गेली दहा ते पंधरा वर्षे खानपान सेवा व्यवसायाशी जोडले गेलेले आहेत. परंतु काम करत असलेल्या व्यवसायातील अनुभवाचा उपयोग करून स्वत:चा व्यवसाय सुरू करायचा या हेतूने या मित्रांनी लंडन, मस्कत यांसारख्या ठिकाणची आपली नोकरी सोडली आणी आपल्या गावी अर्थात भाईंदरला परतले आणि त्यांनी सुरू केले चटनी चाट.

दुकानाच्या पाटीवर लिहिलेली ‘लिीटिल स्पेस बिग टेस्ट’ ही अक्षरेच आतमध्ये काहीतरी वेगळी डिश मिळणार याची साक्ष देतात. दिल्ली बटाटा, मोनॅको चीज बाइट्स आणि इटालियन पकोडा या सर्वाधिक मागणी असणाऱ्या डिश. खेरतर दिल्ली बटाटा या आगळ्या वेगळ्या पदार्थाचे जनक आहेत प्रणवचे आजोबा दामोदर ऊर्फ राजाभाऊ चावंडे. १९७९ ते १९९० पर्यंत भाईंदर पश्चिमेकडच्या शाळांच्या बाहेर त्यांनी हा पदार्थ विकायला सुरुवात केली. हा पदार्थ ते स्वत: तयार करायचे आणि आबालवृद्धांमध्ये तो लोकप्रिय ठरला. आजोबांच्या या पदार्थाची रेसिपी कायम ठेवून हा पदार्थ चटनी चाटमध्ये उपलब्ध आहे. उकडलेले बटाटे, कडीपत्ता, हिंग, आमचूर पावडर, तिखट , मीठ आणि हळद यांचे मिश्रण तयार करून ते तेलावर परतले आणि वरतून कोथिंबीर पेरली की तयार होते ‘दिल्ली बटाटा’ ही डिश, याचे वैशिष्टय़ म्हणजे यात कांदा आणि लसूण यांचा अजिबात वापर केला जात नाही.

मोनॅको चीज बाइट्स हा खास बच्चे कंपनी आणि तरुणाईचा पदार्थ, हलापेनॉ पेपर या अमेरिकी मिरचीचे तुकडे, मोझरेला चीज, पावाचा चुरा यांच्या मदतीने हा पदार्थ तयार केला जातो. हे सर्व मिश्रण एकत्र करून तेलात तळायचे. मोनॅको बिस्किटवर चीज, टोमॅटो केचअप आणि मायोनीज पसरून त्यावर तळलेले चॉपिंग्ज ठेवले जाते आणि मग हलकेच त्यावर मायोनीजचा थेंब सोडला की तयार होते मोनॅको चीज बाइट्स.

इटालियन पकोडा हा देखील सर्व वयोगटातील खवय्यांना आवडणारा पदार्थ. उकडलेला आणि कुस्करलेला बटाटा, पनीर, ग्रीन आणि ब्लॅक ऑलिव्ह, ओरीगॅनो, मोझरेला चीझ यांच्या मिश्रणाला चण्याच्या पिठाचे आवरण देऊन ते तेलात तळले की तयार होतात खमंग इटालियन पकोडा.

या तीन पदार्थासोबतच पापडी चाट, कच्ची कैरी शेव पुरी अशा एकापेक्षा एक आकर्षक आणि चविष्ट अशा डिश चटनी चाटमध्ये उपलब्ध आहेत. या हटके डिशसोबतच पोहे, उपमा, मिसळ असे नेहमीचे पदार्थही इथे मिळतात. डिशचे दरही अगदी वाजवी आहेत, रस्त्यावरील स्टॉलवर मिळणाऱ्या डिशच्या दरात, मात्र स्वच्छतेची संपूर्ण काळजी घेऊन आरोग्याला हितकारक असे पदार्थ देण्याचा दावा चटनी चाट करते. या दुकानात मिळणारे पदार्थ बाहेर सहजासहजी मिळत नाहीत. म्हणूनच त्यांची चव घेण्यासाठी पावले चटनी चाटकडे आवर्जून वळवावीत. दुकानात जायचा कंटाळा असेल तर हे पदार्थ घरी मागवण्याचीही सोय आहे, हे पदार्थ कोणतेही अतिरिक्त शुल्क न घेता घरपोच देण्याची सुविधा या ठिकाणी आहे. सध्या हे दुकान छोटे असले तरी लवकरच दुकानांची साखळी तयार करण्याचा मित्रांचा मानस आहे.

‘चटनी चाट लीग’

* पत्ता : परेरा हाऊस, दुकान क्रमांक ४, दत्त मंदिरसमोर, उत्तन रोड, भाईंदर पश्चिम

* संपर्क : ९९३०१५०२०२