(संकलन – श्रीकांत सावंत, किन्नरी जाधव, शलाका सरफरे, भाग्यश्री प्रधान)

चित्रपटामुळे समाज घडतो की बिघडतो, हा या कलेच्या उगमापासून विचारला जाणारा प्रश्न. चित्रपटांत दाखवण्यात येणारी हिंसा, प्रणयदृश्ये, गाणी, नृत्य, संवाद या सर्वावर वेळोवेळी चर्चा होत आली आहे. या चर्चेला समाजमाध्यमांतून मोठे व्यासपीठ लाभले आहे. त्यामुळे अलीकडे कोणताही नवीन सिनेमा येण्याआधीपासूनच त्याची चर्चा, त्यावरील वाद, त्याच्याशी संबंधित किस्से समाजमाध्यमांतून समोर येत असतात. यावर होणाऱ्या चर्चेत युवापिढी सर्वाधिक आघाडीवर असते. चित्रपटाचं परीक्षण करायला त्या कलेचा आवाका, तंत्राची माहिती, चित्रपटांचा इतिहास असं माहिती हवं, असं म्हटलं जातं. पण आजची युवा पिढी अशा तंत्रशुद्ध परीक्षणाच्या भानगडीत न पडता त्यातून मनाला जे भावतं, भिडतं, यावर भाष्य करते. अलीकडेच लोकप्रिय ठरलेला ‘सैराट’ चित्रपट अशाच चित्रपटांपैकी एक. या चित्रपटानंतर समाजमाध्यमांतून सुरू झालेली चर्चा संपण्याचे नाव घेत नाही. या पाश्र्वभूमीवर चित्रपटांचं समाजातलं नेमकं स्थान काय, त्यांचा कितपत परिणाम समाजावर होतो, त्यातून घेण्यासारखं आणि टाकण्यासारखं किती असतं, हे जाणून घेण्यासाठी ‘लोकसत्ता ठाणे’ने ‘कट्टय़ावरची गोलमेज’च्या माध्यमातून तरुणाईची मते जाणून घेतली. ठाणे-मुंबईतील विविध महाविद्यालयांच्या निवडक विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग नोंदवत आपले विचार मांडले. चित्रपट हे एक प्रभावी माध्यम असले तरी त्याच्यामुळे समाज घडतो किंवा बिघडतो असे म्हणणे अयोग्य ठरेल, असे स्पष्ट मत या विद्यार्थ्यांनी व्यक्त केले. दोन-अडीच तासांच्या चित्रपटांचा प्रभाव मर्यादित असतो. प्रत्यक्षात त्यापेक्षा कितीतरी जास्त घटकांचा प्रभाव आयुष्यावर असतो. संस्कार, परंपरा, रूढी आणि समाजातील वास्तव या सगळ्या गोष्टी चित्रपटांपेक्षा अधिक परिणाम करतात. काही चित्रपटांचा परिणाम दीर्घकाळ राहात असला तरी तो आयुष्याची दिशा ठरवत नाही. त्यामुळे चित्रपट पाहात असताना तो मनोरंजन म्हणून पाहणे अधिक योग्य ठरेल, असा सूर या विद्यार्थ्यांनी लावला.

Crew actor Trupti Khamkar says was not given any lines
१२ तासांचं काम अर्ध्या तासात…, मराठमोळ्या तृप्ती खामकरने सांगितला ‘क्रू’च्या सेटवरचा अनुभव; म्हणाली, “बाजूला उभे राहून…”
Gangu Ramsay
व्यक्तिवेध: गंगू रामसे
Amitabh Bachchan stopped talking to Jaya Bachchan
दोन दिवस जया बच्चन व मुलांशी बोलले नव्हते अमिताभ बच्चन, ‘त्या’ चित्रपटाच्या सेटवर असं काय घडलं होतं? जाणून घ्या
Loksatta kutuhal Use of artificial intelligence in film
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेची चित्रपटातील बीजे

चित्रपटांचा समाजमनावर होणारा परिणाम पोषक की घातक?

केवळ चित्रपट पाहून त्यातील आशय सत्य मानणारा एक मोठा वर्ग आपल्याकडे आहे. त्याचप्रमाणे चित्रपटात दाखवलेले प्रसंग, चित्रित केलेली स्थळे केवळ चित्रीकरण आहे. तो एक आभास आहे. ते सत्य नाही, हे माहिती असूनही बहुतेक प्रेक्षक वैयक्तिक आयुष्याशी चित्रपटाची सांगड घालतात. दिवास्वप्नात रमतात. काही वेळापुरते हे ठीक असते. मात्र त्याचा दीर्घकाळ प्रभ़ाव राहात असेल, तर करिअरसाठी ते धोकादायक ठरू शकते. त्यामुळे चित्रपट पाहताना आपला दृष्टिकोन काय आहे, यावर त्याचा प्रभाव ठरतो.

– निकिता रावळ

चित्रपट पाहण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा असतो. अनेक चित्रपट वेगवेगळे आशय घेऊन प्रेक्षकांसमोर येत असतात. काही चित्रपटांतील विषयांचा समाजमनावर परिणाम होत असतो. चित्रपटाची कथा प्रेक्षकांच्या नजरेतून कशी पाहिली जाते, यावर हा परिणाम पोषक की घातक हे ठरूशकते. वयोगटानुसार आशयाचा प्रभाव प्रेक्षकांवर पडतो. यामुळे एकच चित्रपट वेगवेगळ्या वयातील प्रेक्षकांना नवीन शिकवत असतो.

– उमा साळवे

आपल्या समाजात आणि कुटुंबामध्ये आपण ज्या गोष्टीवर कधीच बोलू शकत नाही, अशा गोष्टी चित्रपटांच्या माध्यमातून सहजपणे उलगडलेल्या असतात. दिग्दर्शकाला समाजातील याच गोष्टींवर प्रकाश टाकायचा असतो. यामुळे समाजामध्ये त्या वाईट चालीरीतींबद्दल व्यापक चर्चा होऊन अशा कुप्रथा बंद होण्यास चित्रपट योग्य माध्यम ठरू शकतो. चित्रपटामध्ये दाखवलेल्या गोष्टी केवळ वैयक्तिक पातळीपुरत्या घ्यायच्या तर त्यातून कुटुंबातील संवाद वाढू शकतो. त्यामुळे चित्रपटांचा समाजावर चांगलाच परिणाम होत असतो.

– आकाश ऐतवडे

चित्रपटाचे आशय आणि विषय काय आहेत, यावरूनच समाजावर त्याचे होणारे परिणाम ठरत असतात. चांगल्या आशयाचे चित्रपट चांगल्या पद्धतीने विचार करायला भाग पाडतात. मात्र हा प्रभाव खूप दिवस राहतो असे नाही. एका ठरावीक वेळेनंतर हा प्रभाव संपतो. चांगले चित्रपट मात्र आयुष्यभर लक्षात राहतात. मनाला आनंद देत राहतात.

– ललितकुमार धनवलकर

चित्रपटांचा समाजमनावर पोषक आणि घातक असा दोन्ही प्रकारे परिणाम होतो. चित्रपटांचा आशय, त्याची मांडणी आणि प्रेक्षकांची मानसिकता यावरून समाजावर होणारा परिणाम ठरत असतो. त्यामुळे होणारे परिणाम हे त्या-त्या चित्रपटाच्या आशयावर किंवा त्या आशयाबद्दलच्या प्रेक्षकांच्या जाणिवेवर अवलंबून असतो. उदाहरणार्थ, आपण जेव्हा एखादी प्रेमकहाणी असलेला चित्रपट पाहतो. त्यावेळी आपण एक वेगळ्या अंगाने विचार करतो. मात्र जेव्हा तोच चित्रपट आपण पालकांसोबत पाहतो, तेव्हा त्यावर चर्चा होते आणि एक वेगळाच पैलू उलगडतो.

– अमृता घावट

सिनेमा हा कायमच समाजाचे प्रतिनिधित्व करत असतो किंवा घडणाऱ्या गोष्टींवर भाष्य करत असतो. काही गोष्टी सिनेमामध्ये दाखवल्या जातात. त्यापेक्षा खूप वेगळ्या असतात. सध्या चित्रपटांच्या माध्यमातून दाखवल्या जाणाऱ्या आधुनिकतेचे लोक अनुकरण करतात, परंतु आधुनिकता ही केवळ पेहरावातून नाही तर वृत्तीमध्ये दिसली पाहिजे. कृतीतून आधुनिकता येण्यासाठी विचारांना चालना देणे गरजेचे असते. चित्रपट हे आपल्या विचारांना चालना देणारे उत्तम माध्यम आहे. चित्रपटांमधून मांडण्यात आलेल्या अनेक चांगल्या विचारांचेही आपण अनुकरण करू शकतो.

– श्रद्धा खेडकर

 

चित्रपट माध्यम मनोरंजन की प्रबोधन?

तरुणांच्या दृष्टिकोनातून विचार करता चित्रपटात प्रबोधन आणि मनोरंजन या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. केवळ आशय, कथा मांडली तर कदाचित तरुण अशा चित्रपटांकडे फार आकर्षित होणार नाहीत. मनोरंजन मूल्य महत्त्वाचे आहेच, पण त्याबरोबरीनेच नकळतपणे प्रबोधन करणारे चित्रपट आशयघन असतात. त्यात ज्ञानरंजनाचा समतोल राखला जातो.  ज्येष्ठांसह तरुणही अशा चित्रपटांकडे आकर्षित होतात. याचा अर्थ केवळ आशयात्मक किंवा कलात्मक चित्रपटांची निर्मिती होऊ नये असा नाही. अनेक चित्रपटांनी प्रबोधन आणि मनोरंजनाचा समतोल साधलेला दिसून येतो.

– निकिता रावळ

चित्रपटांमध्ये मनोरंजन आणि प्रबोधन या दोन्हीची सांगड घालता येणे गरजेचे आहे. चित्रपटातून केवळ प्रबोधन झाले तर ते चित्रपट कुणी बघायलाही जाणार नाही. मात्र त्याच चित्रपटात मनोरंजन असेल तर चित्रपट आपोआप बघितला जाईल. यामुळे मनोरंजनाबरोबरच एक नवा विचार घेऊन नागरिक सिनेमागृहाबाहेर पडतात.

– अस्मिता शिंदे

बहीण-भाऊ, आई-वडील आणि अन्य नातेसंबध समजून घेण्यास चित्रपट अधिक उपयुक्त ठरतोचित्रपट मनोरंजनात्मक असल्यास त्याचा चांगला प्रभाव होतो. मात्र त्यात केवळ प्रबोधन असेल तर मात्र तो पाहिला जात नाही. त्यामुळे मनोरंजनात्मक चित्रपटांमधूनही चांगले संदेश दिल्यास चांगले समाजमन घडण्यास मदत होऊ शकते.

– आकाश एतवडे

चित्रपट निर्मिती केवळ नफा मिळवण्याच्या उद्देशाने केली जाते. त्यामुळे त्यातून केवळ प्रबोधन करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. चित्रपट हे केवळ मार्केटिंग असते. एखाद्या उत्पादनाची विक्री करण्याचा प्रयत्न त्यातून केला जातो. चित्रपट हेसुद्धा एक उत्पादन असून ट्रेलर, संगीत आणि विषयाच्या जाहिरातीवरून त्याचे पूर्णपणे मार्केटिंग करून ते प्रेक्षकांच्या गळी उतरवले जाते. त्यामुळे चित्रपट पाहून समाज घडतो किंवा बिघडतो असे म्हणणे चुकीचे ठरेल.

– ललितकुमार धनवलकर

पूर्वी केवळ मनोरंजन म्हणून चित्रपट पाहिले जात होते. मात्र आता चित्रपट प्रदर्शित होण्याआधी आणि चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर विविध वृत्तपत्रांतून प्रसिद्ध होणारे समीक्षण वाचले की आपणही अभ्यासाच्या हेतूने चित्रपट पहावा असे जाणवते. पडद्यावर दिसणाऱ्या कथानकामागे दिग्दर्शकाचा काय हेतू आहे, हे समजून घेण्याचा प्रयत्न चिकित्सक वृत्तीने करता येतो.  लघुपट निर्मितीसाठी तरुणांना शोधावे लागणारे बारकावे चित्रपटाच्या माध्यमातून अभ्यासता येतात. मनोरंजनासाठी चित्रपट अशी प्रेक्षकांची मानसिकता असल्याने बहुतेक वेळा चित्रपट अभ्यासाच्या दृष्टीने न पाहता केवळ मनोरंजन हेच उद्दिष्ट असते.

– उमा साळवे

 

नायक, नायिकांचा कितपत प्रभाव असतो

एखाद्याच्या वैयक्तिक आयुष्यात किती लक्ष द्यावे याचा विचार होणे गरजेचे आहे. नायक किंवा नायिका त्या सिनेमापुरते मर्यादित असतात. सामान्य आयुष्य जगताना ती आपल्यासारखी माणसे असतात. त्यांनाही आपल्यासारखीच सुख-दु:खे, अडीअडचणी असतात. त्यांनाही बरेच काम करावे लागते. याचा विचार व्हायला हवा.

– अस्मिता शिंदे

 

हिंदी-मराठी चित्रपटांतील फरक

हिंदी सिनेमांमध्ये पूर्वीपासून प्रेमकथा दाखविण्याची प्रथा आहे. आताही त्यात फारसा फरक पडलेला दिसत नाही. हातावर मोजण्याइतके चित्रपट काहीतरी आशय देणारे होते. मात्र मराठीमधील नवे सिनेमे काहीतरी वेगळा आशय देण्याचा प्रयत्न करतात. खरे तर कुठल्याही कलेची भाषेशी तुलना होऊ शकत नाही, असे माझे प्रामाणिक मत आहे.

– शुभम मोरे

 

पालकांसोबत चित्रपट पहावा की मित्र-मैंत्रिणीबरोबर?

चित्रपट पालकांबरोबर पाहिला काय किंवा मित्र-मैत्रिणींबरोबर पाहिला काय. चित्रपटाचा आशय ओळखणे अतिशय गरजेचे आहे.पालकांबरोबर चित्रपट पाहिल्यानंतर चांगली चर्चा होणे गरजेचे आहे तर मित्र-मैत्रिणींबरोबर चित्रपट पाहताना सिनेमातील चुकांबरोबर आवडलेल्या गोष्टी बोलण्याने सिनेमा समजण्यास अधिक मदत होते.

– अस्मिता शिंदे

 

एखाद्या चित्रपटाच्या नायक किंवा नायिकांमध्ये तुम्ही स्वत:ला पाहता का?

बरेच चित्रपट हे बोलके असतात. चित्रपटात घडलेले काही प्रसंग आपल्या सहज लक्षात राहतात. जे प्रसंग आपल्या आयुष्यात सहज घडणारे असतात किंवा काही घडून गेलेलेही असतात. असा एखादा प्रसंग पाहतांना ‘अरे हे आपल्या बाबतीत घडले आहे किंवा घडू शकते’ असे वाटते. त्यानंतर त्या चित्रपटाशी आपण समरूप होतो.

– शुभम मोरे

 

समाजमाध्यमांनी आवरावे

एखादा चित्रपट कसा आहे, हे ज्याचे त्याने ठरवायचे असते. समाज माध्यमांचा चुकीचा वापर करून चित्रपटांच्या प्रसिद्धीला वेगळ्या कलाटण्या देणारा वाईट प्रचार थांबवला पाहिजे. हे केवळ चित्रपटांपुरतेच मर्यादित न राहता सगळ्याच गोष्टींमध्ये ही काळजी नागरिकांनी घेतली पाहिजे. अभिनेते- अभिनेत्रीवर चिखलफेक निंदनीय

– अमृता घावट