४० टक्के अतिरिक्त पाणी उपलब्ध; पुढील वर्षी विस्तारीकरण पूर्ण करण्याचा निर्धार

ठाणे : सध्या अपूर्णावस्थेत असलेल्या बारवी धरण विस्तारीकरण प्रकल्पामुळे गेली दोन वर्षे उपलब्ध होत असलेल्या ४० टक्के अधिक पाण्यानेच ठाणे जिल्ह्य़ातील शहरांना तारल्याचे दिसते. विस्तारीकरण प्रकल्प पुढील वर्षी पूर्ण करण्याच्या दृष्टीने युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. या विस्तारीकरणानंतर ठाणे जिल्ह्य़ाचा एकूण जलसाठा तब्बल १०६ दशलक्ष घनमीटरने वाढणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठाणे जिल्ह्य़ातील शहरी भागाला पाणीपुरवठा करण्यासाठी प्रस्तावित काळू, शाई, पोशिर आणि कुशिवली या धरण प्रकल्पांपैकी एकही पूर्ण न होऊ शकल्याने पाण्याची तूट दिवसेंदिवस वाढू लागली आहे. यंदा तुटीचे प्रमाण २२ टक्क्य़ांवर गेले असून मुरबाड तालुक्यातील एमआयडीसीचे बारवी धरण हाच आता अतिरिक्त पाणीपुरवठय़ाचा एकमेव पर्याय आहे. प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेंगाळल्याने बारवी विस्तारीकरण अद्याप अपूर्णावस्थेत असले तरी बहुतेक कामे पूर्ण झाली आहेत. धरणाच्या भिंतीची उंचीही वाढविण्यात आली आहे. त्यामुळे २०१६ पासून बारवी धरणात मूळ क्षमतेपेक्षा ५६ दशलक्ष घनमीटरअधिक जलसाठा होऊ लागला आहे. या ४० टक्के अतिरिक्त पाणीसाठय़ामुळेच ठाणे जिल्ह्य़ातील पाण्याची वाढती गरज भागविणे शक्य झाल्याचे उपलब्ध आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. अन्यथा तुटीचे प्रमाण यापेक्षा अधिक असते.

आता पुढील वर्षी सर्व अडथळे पार करून विस्तारीकरण प्रकल्प पूर्ण करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. पुढील वर्षी या धरणातून ठाणे जिल्ह्य़ास आणखी १०६ दशलक्ष घनमीटर अधिक पाणी देण्याच्या दृष्टीने युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सध्या बारवी धरणात १७८ दशलक्ष घनमीटर जलसाठा होतो. विस्तारीकरणानंतर ३४० दशलक्ष घनमीटर म्हणजेच जवळपास दुप्पट जलसाठा होणार आहे. गेली १० वर्षे प्रकल्पाची कामे सुरू आहेत.

विस्तारीकरणानंतरही तूट राहणारच

* जिल्ह्य़ातील शहरी विभागाला पुण्यातील आंदर धरण, मुरबाडमधील बारवी धरण आणि उल्हास नदी या तीन स्रोतांद्वारे ३९२.४६ दशलक्ष घनमीटर पाणी मिळते.

* रोज १२४० दशलक्ष लिटर्स पाणी उचलण्याची परवानगी आहे. प्रत्यक्षात रोज १५२१ दशलक्ष लिटर्स पाणी उचलले जाते. त्यामुळे ५०३ दशलक्ष घनमीटर इतका जलसाठा आवश्यक आहे. ही तूट भरून काढण्यासाठी आठवडय़ातून एक दिवस पाणीपुरवठा बंद केला जाणार आहे.

* बारवी विस्तारीकरण झाल्यावर १०६ दशलक्ष घनमीटर अतिरिक्त पाणी मिळेल आणि ४९८ दशलक्ष घनमीटर जलसाठा उपलब्ध होईल. गरजेच्या तुलनेत तो अतिरिक्त साठाही अपुरा पडणार आहे.