चार दिवस रांगेत राहूनही कामे अपूर्णच

टपाल कार्यालयातील कामे पूर्ण करण्यासाठी अनेक ग्राहक तासन् तास रांगेत उभे राहतात. मात्र कार्यालयीन कामकाज पूर्ण करण्याआधी रांगेतील शेवटच्या माणसाचे काम पूर्ण करण्याचे सौजन्यही टपाल कर्मचारी दाखवीत नाहीत. टपाल कार्यालयातील कर्मचारी कामाकाजाची वेळ संपली की, तात्काळ खिडकी बंद करतात. रांगेत ताटकळत असणाऱ्या ग्राहकांना सरळ ‘तुम्ही उद्या या’ म्हणून सांगतात. या अरेरावीमुळे ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
बहुतेक टपाल कार्यालयांमध्ये हा प्रकार सुरू आहे. याची दखल वरिष्ठ अधीक्षकांनी घेण्याची मागणी ग्राहकांकडून करण्यात येत आहे. स्थानिक टपाल कार्यालय प्रमुख कर्मचाऱ्यांची बाजू घेऊन, कामाच्या वेळेत खिडकी बंद केली, असे सांगून ग्राहकांची बाजू ऐकून घेत नाहीत, असे ग्राहकांकडून सांगण्यात येते.
बँकेत कामासाठी गेलेला ग्राहक रांगेत असेल आणि बँकेची कामाची वेळ संपली, तरी रांगेतील ग्राहकांना पूर्ण सेवा मिळेपर्यंत खिडकीवरील कर्मचारी आसन सोडत नाही. मग, टपाल कार्यालयातील कर्मचारी वेळेचे बंधन का पाळतात, असा प्रश्न ग्राहकांकडून करण्यात येत आहे. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र, पंतप्रधान योजना, बचत खाते, मासिक व्याज आदी कामांसाठी अनेक ग्राहक दररोज टपाल कार्यालयात येतात. त्यांना कार्यालयात सेवा मिळण्यासाठी अनेकदा एक ते दीड तास रांगेत उभे राहावे लागते. हा रोजचा अनुभव असल्याचे ग्राहकांनी सांगितले.