फसवणूक केल्याचा अंबरनाथकरांचा आरोप
अंबरनाथ पूर्वेकडील मे फ्लॉवर गार्डन सोसायटीमधील रहिवाशांनी या इमारतीच्या विकसकाविरोधात फसवणूक केल्याबद्दल आंदोलन केले आहे. रहिवाशांनी त्यांना दिलेली आश्वासने न पाळल्याचा आरोप बांधकाम व्यावसायिकावर केला असून यामुळेच आंदोलनाचा मार्ग स्वीकारला असल्याचे सांगितले आहे. दरम्यान, या आरोपाचा बांधकाम व्यावसायिकाने इन्कार केला आहे.
अंबरनाथ पूर्व भागात मे. फ्लॉवर गार्डन हे मोठे गृह संकुल आहे. हे गृह संकुल उभारताना संकुलातील एका भूखंडावर रहिवाशांसाठी मॉलची उभारणी करण्यात येणार असल्याचे बांधकाम व्यावसायिकाने कबूल केले असल्याचे रहिवाशांना सांगितले होते. मात्र या भूखंडावर मॉल न उभारता बांधकाम व्यावसायिकाने तेथे रहिवासी इमारत उभारण्याचे काम सुरू केल्याचे रहिवाशांना आढळून आले. तसेच या वेगळ्या इमारतीतील रहिवाशांनाही मे. फ्लॉवर गार्डनच्या सुविधांचा लाभ देण्याची हमी बांधकाम व्यावसायिकाने दिली आहे. त्यामुळे या दोन घटनांविरोधात रहिवाशांनी इमारतीबाहेर बांधकाम व्यावसायिकाविरोधात आंदोलन केले.
दरम्यान, ही नवीन इमारतही याच प्रकल्पाचा भाग असून त्याचे बांधकाम सुरू आहे. याच प्रकल्पाचा भाग असल्याने नवीन इमारतीच्या रहिवाशांनाही या सुविधांचा लाभ मिळाला पाहिजे, तसेच नवीन इमारत सुरू होण्यापूर्वी मॉलचे बांधकाम रद्द केल्याचे येथील रहिवाशांना सांगण्यात आले होते. या प्रकल्पातील सर्व गोष्टी कायदेशीर बाबींच्या अंतर्गत होत आहेत. त्यामुळे फसवणूक केलेली नाही असे बांधकाम व्यावसायिक गुड्डू चव्हाण यांनी सांगितले आहे.