डोंबिवली शहरात अनेक समस्या आहेत. आयएएस ई. रवींद्रन हे सक्षम आयुक्त आता पालिकेला लाभले आहेत. पालिकेच्या कारभाराला शिस्त आणि शहर स्वच्छतेला त्यांनी प्राधान्य दिले आहे. शहराचा स्मार्टसिटी योजनेत समावेश झाला आहे. ही या शहरासाठी आश्वासक बाब आहे. मात्र केवळ सक्षम आयुक्त आणि त्यांचे सहकारी शहरात सुधारणा करू शकत नाहीत. काम करण्याची आयुक्तांची इच्छा असली तरी प्रशासनातील एक भ्रष्ट आणि लाळघोटी व्यवस्था चांगल्या माणसाला काम करू देत नाही. राजकीय अडथळे असतात. यासाठी शहरातील नागरिकांचेही तेवढेच सहकार्य प्रशासनाला अपेक्षित असते. डोंबिवलीत सामाजिक भान, विचार करणारी मंडळी आहेत. अशा नागरिकांना हाताशी धरून प्रशासनाने पालिकेचा गाडा चालवला तर नक्कीच या नागरी सुविधा उपलब्ध होतील. त्याचबरोबर या शहराचे भाग्य उजळेल.

रस्ते, वीज, पाणी, मलनिस्सारण, आरोग्य, वाहतूक, स्वच्छता या सर्वच क्षेत्रांत काम करणारी मंडळी शहरात आहेत. त्या त्या क्षेत्रात निष्णात असलेल्या व्यक्तींना जर प्रशासनाने आपल्या उपक्रमात सहभागी करून घेतले तर महापालिका प्रशासनाला गतिमान कामे करणे शक्य होईल. प्रत्येक कामाची, क्षेत्रासाठी देण्यात येणारी कंत्राटे त्यातील अटी व शर्तीसह पारदर्शीपणे प्रसिद्ध केली तर या कामांमध्ये होणाऱ्या भ्रष्टाचारावर अंकुश बसवणे शक्य होईल. त्या कामाची गुणवत्ता काय आहे, याची जबाबदारी शहरातील काही नागरिकांच्या गटांना दिली तर ते आपले काम नक्कीच प्रामाणिकपणे पार पाडतील. असे प्रभागाप्रमाणे नागरिकांचे गट तयार झाले, त्यांना आयुक्तांपर्यंत आपली मते पोहोचवण्याची संधी उपलब्ध झाली तर स्मार्टसिटी बनण्यास वेळ लागणार नाही.