News Flash

मतदारांना ‘रंग’साद

विविध शाळेच्या विद्यार्थ्यांनी शहरातील काही भागांमध्ये अशा प्रकारे मतदान जागृती करणारी चित्रे काढली आहेत.

मतदारांना ‘रंग’साद
भिंतीवर मतदान जागृतीसाठी रंगरंगोटी केली जात आहे. 

 

भित्तीचित्रांद्वारे नागरिकांना मतदानाचे आवाहन

ठाणे महापालिका निवडणुकीदरम्यान शहरातील मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी महापालिकेने व्यापक प्रयत्न सुरू केले असून आता पेंट दी वॉलच्या माध्यमातून जनजागृतीपर भित्तीचित्र रंगविण्यात येत आहेत. तसेच शहरातील चित्रपटगृहांच्या पडद्यावरून दृक्श्राव्याच्या माध्यमातून शहरातील नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन केले जात आहे.

शहरभर सुरू असलेल्या पेंट दी वॉलच्या माध्यमातून राष्ट्रीय मतदान दिनाच्या निमित्ताने आयुक्त संजीव जयस्वाल व जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनीही या उपक्रमात सहभागी होऊन भिंतीवर मतदान जागृतीसाठी रंगरंगोटी केली. विविध शाळेच्या विद्यार्थ्यांनी शहरातील काही भागांमध्ये अशा प्रकारे मतदान जागृती करणारी चित्रे काढली आहेत. या चित्रांमध्ये ‘बी अ रिस्पॉन्सिबल सिटिझन, कास्ट युअर वोट’, ‘आपका वोट देश की तकदीर और तसबीर बदल सकता है’ अशी वाक्ये या भित्तीचित्रामध्ये लिहिण्यात आली आहेत.

त्याचबरोबर महापालिकेने चार माहितीपटांची निर्मिती केली आहे. अभिनेता मंगेश देसाई हा या संपूर्ण जागृती उपक्रमाचा चेहरा असून त्याच्याकडून नागरिकांना जनजागृती संदेश दिले जात आहेत. मतदानाचे आवाहन करण्याबरोबरच निवडणुकांच्या काळात कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडता आपला मतदान हक्क बजावावा, असा संदेश यातून दिला जात आहे. तसेच शहरातील बस स्टॉप, जाहिरात फलकांवरही वेगवेगळ्या घोषवाक्यांच्या साहाय्याने नागरिकांमध्ये मतदानाबद्दलची जागरूकता वाढवण्याचे प्रयत्न सध्या सुरू करण्यात आले आहेत. या माध्यमातून प्रामुख्याने नव्या तरुणांना मतदान प्रक्रियेकडे आकर्षित करण्याचा महापालिकेचा प्रयत्न राहणार असल्याचे महापालिकेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

लघुपट आणि फलक

ठाणे महापालिकेची निवडणूक २१ फेब्रुवारी रोजी होत असून यावेळी जास्तीत जास्त नागरिकांनी मतदानास उतरावे यासाठी महापालिकेच्याकडून विशेष प्रयत्न सुरू झाले आहे. लघुपट, फलक, भित्तीचित्र आदी माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने मतदानाचे महत्त्व सांगण्याचा प्रयत्न केला आहे. शिवाय मतदानाच्या दिवशी मतदान करून देश घडवण्यासाठी हातभार लावण्याचा संदेश दिला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2017 1:35 am

Web Title: citizens appealed to voting by drawing
Next Stories
1 आरोप-प्रत्यारोपांचे युद्ध सुरू!
2 ‘प्रभाग’फेरी : ‘अरुंद’ कोपरीचे हाल सरेनात
3 गुंड, टोळय़ांवर पोलिसांचा बडगा!
Just Now!
X