ठाणे शहरातून जाणाऱ्या महामार्गावरील नितीन कंपनी तसेच मानपाडा उड्डाणपुलाखाली विकसित करण्यात आलेल्या उद्यानांना ठाणेकरांकडून मोठा प्रतिसाद मिळू लागला आहे. विविध शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सहलींनी ही उद्याने गजबजू लागली आहेत. या दोन उद्यानांना मिळणारा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन महापालिकेने पूर्व द्रूतगती महामार्गालगत असलेल्या कॅडबरी आणि माजिवडा भागात उड्डाणपुलाखाली दोन नव्या उद्यानांची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे.

येत्या दोन ते तीन महिन्यांत ही उद्याने विकसित केली जातील. त्यामुळे महामार्गालगत ठाणेकरांना विरंगुळ्याची नवी ठिकाणे उपलब्ध होणार आहेत. मुंबई-नाशिक आणि मुंबई-अहमदाबाद असे दोन प्रमुख महामार्ग ठाणे आणि घोडबंदर भागातून जातात. या दोन्ही महामार्गावरील चौकांमध्ये उड्डाणपुलांची उभारणी करण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांपासून उड्डाणपुलांखाली असलेल्या मोकळ्या जागेत अस्वच्छता होती. पुलाखाली अंधार असल्यामुळे तिथे गर्दुल्लेही वाढले होते. तसेच काही ठिकाणी बेकायदा वाहने उभी केली जात होती. या सर्व बाबी लक्षात घेऊन महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी उड्डाणपुलाखाली उद्यानांची उभारणी करण्याचा निर्णय गेल्यावर्षी घेतला. यानुसार जयस्वाल यांनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची परवानगी घेऊन त्या ठिकाणी उद्यानांचे काम सुरू केले. दोन महिन्यांपूर्वी नितीन कंपनी आणि मानपाडा येथील उद्यानांचे काम पूर्ण करून ते नागरिकांसाठी खुले करण्यात आले होते. महामार्गास लागूनच असलेल्या या उद्यानांना ठाणेकरांचा कितपत प्रतिसाद मिळेल याविषयी साशंकता होती. मात्र, सकाळ-सायंकाळी ठाणेकरांची मोठी गर्दी उसळू लागली असून शालेय विद्यार्थ्यांच्या सहलींनी ही उद्याने फुलून जाऊ लागली आहेत. हा प्रतिसाद लक्षात घेता आता कॅडबरी आणि माजिवडा येथील उड्डाणपुलाखालीही उद्याने विकसित करण्यात येणार आहेत. येत्या दोन ते तीन महिन्यांत ही कामे पूर्ण केली जाणार आहेत.

कॅडबरी-बाळकुम उड्डाणपुलाखाली असलेला परिसर हिरवागार केला जाणार असून त्याभोवती संरक्षक जाळ्या बसविण्यात येणार आहेत. या सर्वच उद्यानांच्या निर्मितीसाठी महापालिकेकडून कोणताही निधी खर्च करण्यात आला नसून शहरातील विकासकांच्या माध्यमातून ही उद्याने उभारली जात आहेत. याशिवाय, जुने विद्युत खांब तसेच अन्य वस्तूंना नव्याने मुलामा चढवून उद्यानात वापरण्यात आले आहेत.