कामण-बापाणे रस्त्यासाठी भूसंपादन आणि निधी मंजूरीनंतरही रखडपट्टी

वसई : कामण ते बापाणे रस्त्याच्या कामाला वीस वर्षांपूर्वी मंजुरी मिळाली आहे, मात्र तरीही या रस्त्याच्या कामाला अद्याप सुरुवात झाली नसल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

वसई पूर्वेतील भागात कामण-बापाणे परिसर आहे. या भागातून राष्ट्रीय महामार्ग व राज्य मार्ग यांना जोडणारा कामण ते बापाणे असा रस्ता तयार करण्यात येणार होता. या रस्त्याच्या कामासाठी वीस वर्षांपूर्वी जागेचे भूसंपादन होऊन यासाठी निधी उपलब्ध झाला होता. पंरतु सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जीमुळे या रस्त्याच्या कामाला सुरुवात होऊ  शकलेली नाही.

सध्या हा रस्ता वसई-विरार महापालिकेच्या विकास आराखडय़ात नमूद करण्यात आला आहे. त्यामुळे हा रस्ता महापालिकेतर्फे बनविण्यात यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे, मात्र याकडे अजूनही पालिकेने दुर्लक्ष केले असल्याने अजूनही या रस्त्याच्या कामाला सुरुवात होऊ  शकली नसल्याचे येथील नागरिकांनी सांगितले आहे.

कामण-बापाणे असा कच्चा रस्ता आहे. पावसाळ्यात या भागात चिखल तयार होत असल्याने या मार्गाचा वापर होत नाही अशा वेळी या भागात राहणाऱ्या नागरिकांनाही येथून पायी प्रवास करावा लागत आहे. तसेच, कामण व इतर भागांत राहणाऱ्या नागरिकांना सध्या चिंचोटीवरून वळसा घालून प्रवास करावा लागतो यासाठी कामण ते बापाणे असा सरळ रस्ता करण्यात यावा, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात आहे. जर हा रस्ता तयार झाला तर कामण, पोमण, नागले, शिल्लोत्तर यासह इतर भागांत राहणाऱ्या नागरिकांना नायगाव स्थानक व इतर ठिकाणी पोहचण्यासाठी सोयीचे होणार असून इंधनाची व वेळेची बचत होणार आहे, असे रस्ता संघर्ष समितीचे केदारनाथ म्हात्रे यांनी केला आहे.

आतापर्यंत महापालिकेने केवळ या भागातील रस्त्याचे डिजिटल सर्वेक्षण करून सीमांकने करून ठेवली आहेत. त्यालाही काही महिन्यांचा कालवधी उलटून गेला तरीही पालिकेने कोणतीच पावले उचलली नसल्याने या रस्त्याच्या कामाची सुरुवात होऊ  शकली नसल्याचे म्हात्रे यांनी सांगितले आहे.

कामण-बापाणे हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असून त्यांच्याकडून भूसंपादन करण्यासाठी पालिकेने पत्रव्यवहार केला असून पुढील कार्यवाहीसाठी पाठपुरावा केला जाईल.

– सुरेंद्र ठाकरे, उपअभियंता बांधकाम, प्रभाग ‘जी’