कचऱ्याच्या धुरामुळे नागरिक त्रस्त
दिवाळीच्या निमित्ताने अवघे कल्याण शहर रोषणाईने उजळून गेले असताना, या प्रकाशावर पेटत्या कचऱ्याच्या धुराचा अंधार दाटू लागला आहे. आधारवाडी कचराभूमीवर जाळण्यात येणाऱ्या कचऱ्याच्या धुरामुळे शहरात प्रदूषण आणि दरुगधी वाढू लागली असून, त्याचा नागरिकांना मोठा त्रास होऊ लागला आहे.
आधारवाडी कचराभूमीवरील कचरा पेटवून त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रकार कल्याणकरांना नवीन नाही. मात्र ऐन दिवाळीतही हे प्रकार सुरू आहेत. दिवाळीच्या काळात फटाक्यांच्या आतषबाजीमुळे आधीच प्रदूषणाची पातळी उंचावलेली असते. त्यातच आधारवाडी कचराभूमीवरील कचराही पेटवण्यात आल्याने तो धूर सर्वत्र पसरत असल्याचे दिसून येते. गेल्या काही दिवसांपासून कल्याणात प्रामुख्याने संध्याकाळी हवेमध्ये कचऱ्याच्या धुराचे लोट पाहायला मिळत आहेत. आधारवाडी कचराभूमी येथील कचऱ्याला आपोआप आग लागत नसून ती लावण्यात येत असल्याचा आरोप काही महिन्यांपूर्वी महापालिका प्रशासनाने केला होता. आगी लावणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करणार असल्याचेही महापालिकेच्यावतीने सांगण्यात आले होते. मात्र याबाबत कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.

दोन दिवसात प्रश्न मार्गी लागेल..
आधारवाडी कचराभूमी येथील कचऱ्यावरील प्रक्रिया सुरू आहे. कचरा प्रक्रियेमध्ये योग्य ती रसायने वापरण्यात येतात. आधारवाडी डम्पिंग ग्राऊंड येथे दररोज १४० कचऱ्याच्या गाडय़ा कचरा वाहून आणत असतात. परिसरात कचऱ्याचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने होण्यासाठी पर्यायी रस्त्याची व्यवस्था सुरू असून येत्या दोन दिवसात कचराविषयक प्रश्न मार्गी लागेल.
– सुरेश पवार, उपायुक्त, घनकचरा विभाग, कडोंमपा