नववर्षांच्या पूर्वसंध्येला बंदोबस्तावरील पोलिसांना चहा-बिस्किटे

लहानथोर सर्वच  नववर्षांच्या स्वागतासाठी जल्लोष करीत असतात. मात्र शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस मात्र या दिवशी डोळ्यात तेल घालून खडा पहारा देत असतात. त्यांची दखल घेऊन मुंबई-ठाण्यातील काही तरुणांनी रविवारी रात्री पोलिसांना चहा बिस्कीटे देऊन त्यांच्या कामगिरीची दखल घेतली.

या गटाची सुरुवात एका अनोख्या पद्धतीने झाली. ज्ञानेश्वरी वेलणकर या तरुणाने २०१५ रोजी या उपक्रमास सुरूवात केली. नववर्षांची पूर्वसंध्या अनोख्या पद्धतीने साजरी करण्याचे तिने ठरवले. त्यातून स्वत:बरोबर दुसऱ्यालाही आनंद मिळावा, हा तिचा हेतू होता. त्यातूनच तिने नववर्ष स्वागताच्या रात्री बंदोबस्ताला असणाऱ्या पोलिसांना मदत करायचे ठरविले. या उपक्रमात रस असणाऱ्या तरुणांचा व्हॉटस् अ‍ॅप ग्रुप तयार केला. त्यात चर्चेअंती बंदोबस्तावरील पोलिसांना चहा बिस्कीटे देण्याचा निर्णय झाला. त्यासाठी लागणारे पैसे त्यांनी वर्गणी काढून जमविले.

तसेच फेसबुकद्वारेही आर्थिक सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळाला.  चहाच्या पाच किटल्या त्यांनी भाडय़ाने घेतल्या होत्या. लुईसवाडी मधून चहा विकत घेतला. पंधरा जणांनी स्वयंसेवक म्हणून या उपक्रमात काम केले.

येऊर, उपवन, तीन हात नाका, नौपाडा, खोपट, तलावपाळी, यांसारख्या अनेक ठिकाणी चहा बिस्कीटाचे वाटप करण्यात आले. सुमारे दीडशे पोलिसांपर्यंत तो पोहोचू शकले. अशाच प्रकारचा उपक्रम मुंबई शहरातही राबविण्यात आला. मुंबई आणि ठाणे मिळून ८०० कप चहा आणि बिस्कीटे त्यांना वाटली. नवीन वर्षांच्या स्वागतासाठी रस्त्यावर आलेल्या नागरिकांनीही त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले.

पोलिसांना चहा बिस्कीट दिल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसला. नववर्षीच्या पूर्वसंध्येला आजची पिढी आमच्यासाठी काहीतरी करत आहे. हे पाहून त्यांना समाधान वाटले. यामुळेच आम्ही या उपक्रमाला ‘कप ऑफ स्माईल’’ हे नाव दिले आहे.     – ज्ञानेश्वरी वेलणकर, गट प्रमुख