मीरा रोड येथील क्वीन्स पार्क परिसरातील नागरिक दुर्गंधीने हैराण

मयूर ठाकूर, लोकसत्ता

भाईंदर : ओला आणि सुका कचरा वेगळा करण्याच्या पालिकेने केलेल्या आवाहनाला नागरिकांनी प्रतिसाद न देता एकत्रित कचरा रस्त्यावरच फेकण्यास सुरुवात केली आहे.मीरा रोड येथील क्विन्स पार्क परिसरातील संत ग्रेगोरियस मार्गावरील रस्ताच्या मध्यभागी दुभाजकावर कचरा टाकला जात आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरून ये—जा करणाऱ्या नागरिकांना मोठय़ा प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.

मिरा भाईंदर महानगरपालिकेकडून स्वच्छ शहरासाठी कोटय़वधी रुपये खर्च करण्यात येतात. परंतु अनेक भागात नागरिक नियमांचे उलंघन असल्यामुळे प्रशासनाच्या डोकेदुखीत भर पडत आहे. या परिसरातील रहिवाशांनी कचऱ्याचे वर्गीकरण करावे लागू नये, म्हणून या ठिकाणी रात्रीच्या वेळी कचरा टाकला जात असल्याच्या तक्रारी पालिकेकडे करण्यता आल्या आहेत.

मीरा रोड येथील क्वीन्स पार्क  परिसरात मोठय़ा प्रमाणात इमारती असून उच्चभ्रू नागरिकांचे वास्तव्य आहे. परिसरात वाहनांची रहदारी अधिक असल्याने पालिकेकडून रस्त्यावर दुभाजकाची निर्मिती करण्यात आली असून  वृक्षलागवड करण्यात आली आहे.

मात्र, दुभाजकाभोवती कचरा टाकत असल्याचे दिसून येत आहे. या ठिकाणी ‘कचरा टाकू नये’ असे पालिकेकडून फलक लावले असतानाही कचरा टाकला जात आहे. पालिकेचे सफाई कर्मचारी या जागेवरून रोज कचरा उचलत आहेत. तरीही या ठिकाणी कचरा टाकला जात असल्याचे रेश्मा वानखडे यांनी तक्रारीत म्हटले आहे.

कचऱ्याचे वर्गीकरण न करणाऱ्या इमारतीचा कचरा उचलला जात नाही. यामुळे याठिकाणी राहणारे नागारिक रस्त्यावरच कचरा टाकत आहेत. कचरा टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल.

-संभाजी पानपट्टे, उपायुक्त  आरोग्य विभाग