आठ महिन्यांपासून वाहतुकीस मार्ग नाही; रस्त्यांवर चिखलाचे साम्राज्य

भाईंदर : मीरा रोड पूर्व येथील शांती नगर सेक्टर-६ परिसरात गेल्या काही महिन्यापासून सुरू असलेले नालेनिर्मितीचे काम अर्धवट स्थितीत रखडल्याने स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत. वाहनांना  ये-जा करण्याकरिता मार्ग मिळत नसल्यामुळे प्रवासी संताप व्यक्त करत आहेत.

मीरा भाईंदर शहरात अनेक भागात सध्या कोटय़वधी रुपये खर्च करून सिमेंट रस्ते आणि नालानिर्मितीचे काम करण्यात येत आहे. मीरा रोड येथील शांती नगर सेक्टर ६ परिसरातदेखील भव्य नालानिर्मितीचे काम करण्यात येत आहे. परंतु गेल्या काही महिन्यापासून हे काम अर्थवट स्थितीतच सोडण्यात आले आहे. या भागातील रस्ता अरुंद असल्यामुळे वाहनाना आणि पादचारी प्रवाशांनादेखील मोठय़ा समस्या निर्माण होत आहे. शिवाय नाल्यातील दूषित पाणी आणि चिखल अनेक वेळा रस्त्यावर येत असल्यामुळे रस्त्याचीदेखील अवस्था बिकट होत चालली आहे.

नाल्यातील दूषित पाणी प्रवाहामुळे या भागात डास आणि मच्छरांच्या प्रमाणात वाढ झाली असून स्थानिक नागरिक हैराण झाले आहेत. नाला अर्थवट स्थितीत सोडण्यात आल्यामुळे प्रवास करताना अपघात झाल्यास जीवावर बेतण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे काम लवकरच पूर्ण करण्यात यावे अशी मागणी नागरिक करत आहेत.

या मार्गावरून मी रोज प्रवास करतो. परंतु हे  काम कित्येक महिन्यापासून  पूर्ण झाले नाही आहे. रस्त्याची अवस्थादेखील बिकट असताना कोणाचे लक्ष याकडे नाही.

– राज पाटील, स्थानिक नागरिक

त्या भागातील काम लवकरच पूर्ण करून घेण्याच्या सूचना संबंधित कनिष्ठ अभियंत्याला देण्यात आल्या आहेत.

– दीपक खांबित, कार्यकारी अभियंता, सा. बां. विभाग