अंबरनाथमधील नागरिक आणि प्रामाणिक रिक्षाचालकही त्रस्त
अडवणुकीचे थांबे – अंबरनाथ
वाढत्या नागरीकरणामुळे अंबरनाथ शहराची लोकसंख्या आणि परीघही मोठय़ा प्रमाणावर वाढतो आहे. शहरात परिवहन सेवा नसल्याने अंतर्गत प्रवासासाठी रिक्षा हा एकमेव पर्याय आहे. शहरातील रिक्षांची संख्याही वाढली असली तरी बेकायदा थांबे, मनमानी पद्धतीने आकारले जाणारे भाडे आणि आरेरावीमुळे ग्राहकांना मनस्तापालाच सामोरे जावे लागते.
अंबरनाथ शहरात डझनभर रिक्षा थांबे तयार झाले आहेत. शहराचा जुना भाग असलेल्या पूर्वेमध्ये रेल्वे स्थानकाबाहेर रिक्षाचालकांची मुजोरी मोठय़ा प्रमाणावर पाहायला मिळते. शिवाजी चौकात बेकायदा रिक्षा थांबा बनल्याने स्थानक परिसरात मोठय़ा प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असते. यात अनेक स्क्रॅप, खासगी वाहतुकीसाठी असलेल्या रिक्षांचा समावेश असतो. क्रमांकही नसल्याने अनेक रिक्षा रात्रीच्या वेळी अंबरनाथ शहरात पाहायला मिळतात. त्याच्या या प्रवासी भरण्याच्या शर्यतीत अनेकदा शिवाजी चौकात मोठी कोंडी निर्माण होते.पश्चिम विभागातही काही वेगळी परिस्थिती नाही. येथेही स्थानकालगत एकमेव अधिकृत थांबा आहे, मात्र त्यापेक्षा रिक्षांची अधिक गर्दी स्कायवॉकखाली निर्माण झालेली दिसते.

कारवाईचा फार्स
बेकायदा रिक्षाचालक स्थानकाबाहेर रिक्षा लावून प्रवासी पळवण्याचे प्रकार करतात. त्यामुळे थांब्यावर नियमानुसार व्यिवसाय करणाऱ्या रिक्षाचालकांच्या रोजगारावर गदा येते. याबाबत अनेक रिक्षाचालकांनी वाहतूक विभागाकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र कारवाई होत नाही.

रात्रीस ‘लूट’ चाले..
जसजशी रात्र होत जाते, तसतसे अनधिकृत रिक्षाचालक आनंदनगर एमआयडीसी अशा लांबच्या पल्ल्यांचे भाडे दुप्पट सांगून प्रवाशांना लुटतात. रात्रीच्या वेळी इतर कोणताही पर्याय नसल्याने प्रवाशांनाही नाइलाजाने दुप्पट भाडे द्यावे लागते. या रात्रीच्या लुटीवर काहीतरी कारवाई व्हावी, अशी मागणी आता नागरिक करीत आहेत.