News Flash

शहरांचा विकास झाडांच्या मुळावर

पाऊस सुरू झाल्यापासून सोसाटय़ाच्या वाऱ्यामुळे कल्याण-डोंबिवलीत ६० ते ७० झाडे उन्मळून पडली आहेत. ठाणे शहरात हे प्रमाण १५० पेक्षा अधिक आहे.

| July 3, 2015 03:07 am

शहरांचा विकास झाडांच्या मुळावर

पाऊस सुरू झाल्यापासून सोसाटय़ाच्या वाऱ्यामुळे कल्याण-डोंबिवलीत ६० ते ७० झाडे उन्मळून पडली आहेत. ठाणे शहरात हे प्रमाण १५० पेक्षा अधिक आहे. ही झाडे का उन्मळून पडतात याचा विचार व्हायला हवा, अशी मागणी सातत्याने पर्यावरणप्रेमी तसेच संस्थांकडून केली जाते. मात्र उन्मळून पडलेली झाडे उचलून रस्त्यावरील वाहतूक सुरळीत केली की आपले इतिकर्तव्य पूर्ण झाले, अशा आविर्भावात महापालिकांचे प्रशासन वावरत असते. डोंबिवलीतील काही पर्यावरणप्रेमींच्या म्हणण्यानुसार उन्मळून पडलेल्या झाडांमध्ये काही झाडे ही जुनी झालेली होती, तर काही झाडांच्या मुळांलगत मातीचा भरावच नव्हता. पावसाळ्यापूर्वी सर्व झाडांच्या फाद्या छाटून झाडांचा समतोल राखण्याचा महापालिकेचा दावाही त्यामुळे फोल ठरला आहे. शहरात टोलेजंग इमारती उभ्या राहत असताना वृक्षांची कत्तल केली जाते. मोठय़ा बिल्डरांच्या विकास प्रस्तावांसाठी शेकडो वृक्षांच्या कत्तलीला यापूर्वीही या दोन्ही शहरांमध्ये हिरवा कंदील दाखविण्यात आला आहे. यामुळे शहरांमधील हिरवे पट्टे नष्ट होत असताना पावसाळ्यात शहरामध्ये असलेली झाडे मानवी चुकांमुळे बळी पडू लागली आहेत.
रस्त्यांचे काँक्रिटीकरण मुळाशी
कल्याण, डोंबिवली शहरात गेल्या काही वर्षांत मोठय़ा प्रमाणावर रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाची कामे सुरू आहेत. ही कामे करत असताना अनेक ठिकाणी रस्ते खोदण्यात आले, तसेच भूमिगत जलवाहिन्या, मलवाहिन्या टाकण्याची कामेही करण्यात आली. शेकडो कोटी रुपयांचे अंदाजपत्रक असलेल्या या कामांना प्राधान्य देत असताना वृक्षसंवर्धनाकडे मात्र डोळेझाक होत आहे. ही कामे करताना रस्त्यांलगत असणाऱ्या झाडांच्या मुळांना धक्का बसू लागला आहे. या झाडांच्या भोवती असलेली माती सैल झाल्याने या मुळांना कसलाच आधार राहत नाही. झाडांच्या फांद्या छाटण्यात येऊनही काही जुनी झालेली झाडे या पावसात तग धरू शकलेली नाहीत. शहरात अजूनही अशी काही झाडे आहेत की पावसात ती उन्मळून पडू शकतात. अशा झाडांच्या फांद्या छाटून त्यांचे वजन कमी करण्यात येत आहे. मात्र तरीही ती झाडे पडण्याचा धोका कमी होत नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
पक्ष्यांनाही धोका
पावसाच्या जोरदार सरींमुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्यामुळे पक्ष्यांच्या अस्तित्वालाही धोका पोहचू लागला आहे. जुनी, जीर्ण झालेली झाडे कोसळल्याने अनेक पक्ष्यांची घरटी उद्ध्वस्त झाली आहेत. या पावसात काही पक्षी जखमी झाले तर काही मृत्युमुखी पडले. जून महिन्यात ५६ पक्षी, ६ साप आणि एका वटवाघूळ जखमी झाल्याची माहिती काही संस्थांकडे उपलब्ध आहे. या पक्ष्यांची सुटका ‘पॉझ’ या संघटनेने केली असून योग्य उपचार करून त्यांना आजूबाजूच्या परिसरात सोडून देण्यात आल्याचे संघटनेचे नीलेश भणगे यांनी सांगितले. जून महिना हा सरासरी पक्ष्यांच्या प्रजननाचा महिना असल्याने शहरातील मोठमोठय़ा वृक्षांवर पक्षी आपली घरटी बांधतात. पावसाळ्यात ही झाडेच पडत असल्याने पक्षी जखमी होण्याच्या घटनांमध्ये वाढ या दिवसांतच होते. दरवर्षी पावसाळ्याच्या चार महिन्यांत साधारण ३०० दूरध्वनी पक्ष्यांना वाचविण्यासंदर्भात या संघटनांच्या बचाव कक्षाला येतात. ठाणे व उपनगरांत सर्वत्र पॉझ संघटनेची टीम सध्या कार्यरत असून पक्षी, प्राणी यांच्या देखभालीसाठी व सुरक्षिततेसाठी ते सतत तत्पर असतात. जखमी पक्षी-प्राण्यांना योग्य ते उपचार देऊन त्यांना पुन्हा जंगलात सोडले जाते. आत्तापर्यंत कबुतर, कोकिळा, कावळा, मैना, घार, रातबगळा, लहान बगळा, नवरंग, चातक, रात्र पारवा आदी जखमी पक्ष्यांना आम्ही प्रथमोपचार देऊन पुढील पुनर्वसनासाठी सोडून दिले असल्याचे नीलेश यांनी सांगितले.
हरित ठाणे अथवा डोंबिवलीचा नारा देणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांना शहरातील जुन्या आणि डेरेदार वृक्षांच्या संवर्धनात काडीचाही रस नसल्याचे चित्र जून महिन्यात कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे पुन्हा अधोरेखित झाले. प्रत्येक झाड आपल्या फांद्या पेलण्याइतके सक्षम असते, पण या फांद्यांचा भार जास्त झाला तर सोसाटय़ाच्या वाऱ्यात ते कोसळते. याचे भान असूनही पावसाळ्यापूर्वी मोठय़ा वृक्षांच्या फांद्या छाटण्याचे कष्ट महापालिकेच्या उद्यान विभागाकडून उपसले जात नाहीत. त्यातच विकासाच्या नावाखाली वाट्टेल त्या प्रमाणात रस्ते खोदले जात असल्याने त्याचा परिणाम झाडांच्या मुळावर होऊ लागला असून ठाणे आणि डोंबिवली या दोन शहरांमध्ये गेल्या पंधरवडय़ात तब्बल २५० पेक्षा अधिक वृक्षांनी आपले प्राण सोडले आहेत. रस्ते खोदणे, भूमिगत मलवाहिन्या टाकणे अशा स्वरूपाची कामे करत असताना इतर संस्थांच्या वाहिन्यांची काळजी वाहणाऱ्या अभियांत्रिकी विभागाला झाडांची मुळे खिळखिळी होत असल्याबद्दल चिंता असत नाही. त्यामुळे एका पावसातच शेकडो झाडांना जलसमाधी मिळू लागली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 3, 2015 3:07 am

Web Title: city developments cutting tree
टॅग : City,Cut
Next Stories
1 पावसाळ्यात वाहन विम्याची सर्वाधिक गरज!
2 शाळाबाह्य़ विद्यार्थ्यांचा शोध निरुपयोगीच!
3 बदलापुरात प्लास्टिक मुक्ती अभियान
Just Now!
X