signalएखादं गाव किंवा नगर महानगर होण्यासाठी त्या गावातील लोकसंख्याच नाही, तर पायाभूत सुविधा वाढणंही आवश्यक असतं. पायाभूत सुविधांमधील महत्त्वाचा घटक म्हणजे रस्ते. मात्र एखाद्या महानगरात केवळ रस्ते असून भागत नाही, त्या रस्त्यांच्या कडेला पदपथ आणि चौकाचौकांमध्ये सिग्नल असणंही तेवढंच महत्त्वाचं आहे. या निकषांवर अगदी ठाण्यासारखं महानगरही मागे पडतं..
ठाबाहेरगावच्या देशांत फिरून आलेल्यांकडून तिकडची वर्णनं ऐकताना खूप मजा येते. त्या देशांमधील स्वच्छता, वाहतूक व्यवस्था, नियोजन यांमुळे भारावले गेलेले हे लोक वारंवार दोन-तीन गोष्टींचा उल्लेख आवर्जून करतात. ‘रस्ते एवढे प्रशस्त होते की विचारता सोय नाही. फुटपाथही स्वच्छ आणि एकही फेरीवाला नाही. सिग्नल लागला की, गाडय़ा आपोआप थांबतातच. रस्ता ओलांडणाऱ्यांना कोणतीही अडचण येत नाही.’ वास्तविक या सर्व गोष्टींचं कौतुक करण्याचं काहीच कारण नाही. कोणत्याही महानगरात ही अशीच परिस्थिती असणं अपेक्षित असतं. पण ठाणे, डोंबिवली, कल्याण या स्वत:ला महानगर म्हणवून घेणाऱ्या शहरांत नेमक्या याच गोष्टींची वानवा आहे.
ठाणे शहराची लोकसंख्या कोटींच्या आसपास जाऊन पोहोचली आहे. घोडबंदर रोड, माजिवडा, बाळकुम, लोकमान्यनगर अशा एके काळच्या ठाण्याबाहेरच्या ठिकाणी गजबजाट होत असला, तरी प्रत्यक्ष ठाणे शहराचा गर्भ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विष्णूनगर, नौपाडा, तलावपाळी आदी भागांतील गर्दीही तिळमात्र कमी झालेली नाही. अशा परिस्थितीत ठाण्यातल्या मुख्य रस्त्यांच्या आसपासचे पदपथ, या रस्त्यांच्या चौकांत सिग्नल आदी गोष्टी फारशा उत्तम नाहीत. ठाण्यातील हरिनिवास, तीन पेट्रोलपंप, गोखले रोडवरील समर्थ भांडार, गावदेवी, मल्हार सिनेमाचा चौक, तलावपाळी आदी ठिकाणी सिग्नल यंत्रणा असूनही नसल्यासारखीच आहे. यापकी काही ठिकाणी सिग्नल यंत्रणाच अस्तित्वात नाही.
या गोष्टीचा फटका मोठय़ा प्रमाणावर रस्त्यांवरून चालणाऱ्या नागरिकांना बसतो. त्यातही ज्येष्ठ नागरिकांना तर रस्ता ओलांडणे मुश्कील होऊन जाते. ठाण्यातील वाहनसंख्याही गेल्या काही वर्षांत वाढली आहे. वर उल्लेख केलेल्या प्रत्येक ठिकाणी वाहनांची वर्दळ असते. अशा वेळी रस्ता ओलांडण्यासाठी ठरावीक वेळ नसल्याने वाहनांच्या रहदारीतून आपली वाट काढत जाण्याची कसरत नागरिकांना करावी लागते.
डोंबिवली आणि कल्याण या ठिकाणीही फारशी वेगळी परिस्थिती नाही. मानपाडा रस्त्यावर असलेला एकमेव सिग्नल वगळता हा गजबजलेला रस्ता ओलांडण्यासाठी नागरिकांना जीव मुठीत घेऊनच चालावं लागतं. एमआयडीसी, स्टेशन परिसर, फडके रस्ता, कल्याणमधील शिवाजी पुतळ्याचा भाग आदी ठिकाणी सिग्नलची आणि शिस्तबद्ध वाहतुकीची गरज असताना प्रत्यक्षात येथे या पायाभूत सुविधांचा अभाव असल्याचंच चित्र आहे. महानगरं म्हणवून घेणाऱ्या आणि स्वतंत्र महानगरपालिका असलेल्या या शहरांमधील रस्त्यांच्या वाहतूक व्यवस्थेची ही परिस्थिती आहे. त्यामुळे कल्याणपल्याडच्या हल्लीच वाढलेल्या अंबरनाथ, बदलापूर, आसनगाव, टिटवाळा आदी छोटय़ा छोटय़ा शहरांचा उल्लेखही न केलेलाच बरा!
रस्त्यांवरील सिग्नलची ही अवस्था असताना पदपथांची अवस्थाही वाईटच  आहे. ठाण्यात निदान पदपथ नावाची व्यवस्था अस्तित्वात आहे. पण डोंबिवली आणि कल्याण या शहरांमध्ये पदपथ आणि दुकाने यांच्यातील सीमारेषा अत्यंत धूसर आहे. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने अधेमधे अशा पदपथांकडे लक्ष द्यायलाही हरकत नाही.
शहरांचा विकास होताना केवळ इमारतींवर आणि भव्य मॉल्सवर भर देऊन चालत नाही. नागरिकांच्या सोयीच्या छोटय़ातल्या छोटय़ा गोष्टीचाही विचार व्हावा लागतो. तसंच शहरीकरण झालेल्या नागरिकांनाही शिस्त शिकवावी लागत नाही. ती आपोआपच अंगी यावी लागते. त्यामुळे वाहतूक व्यवस्था सुधारण्याच्या दृष्टीने या दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत.
रोहन टिल्लू