गणेशोत्सवात निवडणुकांचे पडघम; सर्व पक्षांच्या इच्छुकांत शुभेच्छा देण्यासाठी चढाओढ

निवडणुका काही महिन्यांवर आल्या असतानाच इच्छुक उमेदवारांनी गणेशोत्सवानिमित्त शुभेच्छांचे फलक लावून एक प्रकारे प्रचार सुरू केल्याचे दिसते. यात भाजप, शिवसेना आणि विरोधी पक्षांतील काँग्रेस, राष्ट्रवादीचे इच्छुक उमेदवार आघाडीवर आहेत. मुख्य रस्त्यांपासून ते गल्लीबोळांपर्यंत इच्छुक नेत्यांच्या शुभेच्छांचे फलक झळकत आहेत. दिशादर्शक फलकांवरही राजकीय नेत्यांचे शुभेच्छा फलक लावण्यात आले आहेत. त्यामुळे शहर विद्रूप झाल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

विधानसभा आणि लोकसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. या निवडणुका लढविण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांनी मतदारसंघाची निवड करीत त्यामध्ये उमेदवारी मिळावी म्हणून मोर्चेबांधणी सुरू केली आहे. ठाणे शहर, वागळे, कोपरी, घोडबंदर, कळवा आणि मुंब्रा या शहरांमध्ये इच्छुक उमेदवारांनी शुभेच्छा देणारे फलक लावले आहेत. इच्छुकांनी अगदी एकमेकांना खेटूनच फलक लावले असून त्यातून चढाओढीचे दर्शन ठाणेकरांना घडत आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने एका जनहित याचिकेवर सुनावणी करताना शहर विद्रूप करणाऱ्या बेकायदा फलकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी महापालिकेने गेल्या वर्षी सर्वच सहायक आयुक्तांची अंमलबजावणी अधिकारी म्हणून  नेमणूक केली होती. त्यामुळे हे अधिकारी आता शहर विद्रूप करणाऱ्या फलकांवर काय कारवाई करतात, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

गणेशोत्सव मंडळांना सुगीचे दिवस

ठाणे शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी उभारलेल्या मंडपांच्या परिसरात यंदा दरवर्षीपेक्षा सर्वपक्षीय नेत्यांचे शुभेच्छा फलक अधिक प्रमाणात लागले आहेत. आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर इच्छुक उमेदवारांनी गणेशोत्सव मंडळांना देणगी देऊन त्यांच्या मंडपांच्या परिसरात शुभेच्छांचे फलक लावल्याचे बोलले जात आहे. नेत्यांच्या या फलकबाजीमुळे गणेशोत्सव मंडळांच्या देणगीत भर पडल्याची चर्चा आहे.

कारवाई करणार!

ठाणे महापालिकेने प्रभाग समिती स्तरावर फलकांची परवानगी घेण्यासाठी व्यवस्था केली होती. मात्र परवानगी न घेता फलक लावण्यात आले असतील तर त्याची तपासणी करून दंडात्मक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती महापालिका उपायुक्त संदीप माळवी यांनी दिली.