कुळगाव-बदलापूर नगरपालिकेच्या नाकर्तेपणाला चपराक
प्लास्टर ऑफ पॅरिसने तयार केलेल्या गणेशमूर्तीच्या विसर्जनामुळे तलावांचे प्रदूषण टळावे यासाठी ठाणे महापालिकेने सुरू केलेल्या कृत्रिम तलावांच्या उपक्रमाने प्रभावित होऊन बदलापुरातील एका मोठय़ा वसाहतीने अशा प्रकारचे हौद तयार केले आहेत. ठाणे जिल्ह्य़ातील इतर नगरपालिका आणि महापालिका अशा प्रकारचे उपक्रम राबविताना हात आखडता घेत असताना येथील स्नेह-प्रसाद वसाहतीने गणपती विसर्जनाची एक आदर्शवत पद्धत रूढ केली आहे.
गणेश विसर्जनादरम्यान होणारे जलप्रदूषण टाळण्यासाठी पालिका स्तरावर विविध प्रयत्न केले जात असतानाच पर्यावरण संरक्षणासाठी बदलापूर पश्चिमेकडील ४९ वर्षे जुन्या बंगल्यांच्या स्नेह-प्रसाद सोसायटीने पुढाकार घेतला आहे. अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये पुढाकार घेणाऱ्या या सोसायटीने आता स्वत:च्या घरातील गणेशोत्सवातही चांगला पुढाकार घेत पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. या सोसायटीत एकूण ३० सदस्य असून त्यापैकी १४ जणांकडे घरगुती गणेशोत्सव साजरा केला जातो. या घरातील १४ मूर्ती या शाडूच्या बनविण्यात आल्या आहेत. या मूर्त्यांचे विसर्जन नदीवर अथवा सार्वजनिक विसर्जनस्थळी न करता ते थेट सोसायटीच्या आवारातच करण्यात आले आहे. यासाठी सोसायटीत एक कृत्रिम हौद तयार करण्यात आला असून त्या हौदापर्यंत वाजतगाजत जात या मूर्तीचे तेथे विसर्जन करण्यात आले आहे.

सार्वजनिक विसर्जनस्थळी होणाऱ्या गर्दीचा यंत्रणेवर ताण पडतो. तसेच पाण्याचे प्रदूषणही होत असते. म्हणून पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्यासाठी आम्ही सोसायटीच्या आवारातच शाडूच्या गणपतींच्या विसर्जनासाठी कृत्रिम हौद तयार केले. – जयप्रकाश टांकसाळकर, सोसायटीचे सदस्य