विरोध करणाऱ्या स्थानिक, पालिका अधिकाऱ्यांचा सोमवारी निषेध

घोडबंदर येथील मानपाडा भागातील भरवस्तीत उभारण्यात येत असलेल्या स्मशानभूमीस स्थानिकांनी विरोध दर्शविल्यानंतर सत्ताधारी शिवसेनेने हा प्रस्ताव मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. असे असतानाच स्मशानभुमी बचाव समितीमार्फत येत्या सोमवारी वर्तकनगर ते महापालिका असा मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चामध्ये स्मशानभूमीला विरोध करणाऱ्या राजकीय नेत्यांचा तसेच महापालिका अधिकाऱ्यांचा निषेध करण्यात येणार आहे.

ओवळा-माजिवडा मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी स्मशानभूमीचा मुद्दा विधिमंडळात उपस्थित केला होता. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनात पालकमंत्री एकनाथ शिंदे, आमदार सरनाईक आणि पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांची एक बैठक पार पडली होती.

त्यामध्ये पोखरण रस्ता क्रमांक- एक येथील रेप्टाकॉस कंपनीच्या सुविधा भूखंडावर आणि टिकूजीनीवाडी येथील मुल्लाबाग परिसरातील सुविधा भूखंडावर प्रदूषणविरहित पर्यावरणपूरक स्मशानभूमी उभारण्यास मान्यता मिळाली होती. त्यानंतर ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत याबाबत ठराव करून स्मशानभूमीच्या उभारणीसाठी तीन कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली होती. दरम्यान टिकूजीनीवाडी येथील खेळाच्या मैदानावर स्मशानभूमी उभारणे शक्य नसल्यामुळे ती कॉसमॉस गृहसंकुलाजवळील परिसरात उभारण्यात येणार आहे. त्यास स्थानिकांनी मोर्चा काढून कडाडून विरोध दर्शविला होता.