जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश नसल्याने पालक संभ्रमात

ठाणे :  ठाणे  जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शाळा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशनानुसार २७ जानेवारीपासून सुरू करण्यात आल्या. असे असले तरी शहरी भागातील शाळांबाबत स्वतंत्रपणे निर्देश दिले जाणार होते. तोवर या शाळा सुरू करू नयेत असे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले होते. असे असताना ठाण्यातील काही खासगी शाळांमध्ये दहावीचे वर्ग सुरू झाल्यामुळे पालक, विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

ठाणे जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या शाळा विद्यार्थ्यांसाठी १६ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर ग्रामीण भागांतील पाचवी ते १२वी पर्यंतच्या शाळांसह आश्रमशाळा २७ जानेवारीपासून सुरू करण्याचे निर्देश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे जिल्हा शिक्षण विभागास दिले. तर, शहरी भागातील शाळांबाबत स्वतंत्रपणे राज्य शासनाच्या निर्देशांप्रमाणे निर्णय घेण्यात येणार होता. प्रत्यक्षात ठाणे शहरातील वर्तकनगर, लोकमान्य नगर, सावरकरनगर या भागातील खासगी शाळांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगी शिवाय दहावीच्या विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. येत्या २९ एप्रिलपासून दहावीच्या परीक्षेला सुरुवात होणार असल्याने या शाळा सुरू केल्या जात असल्याचे व्यवस्थापनांकडून सांगितले जात असले तरी यासंबंधी जिल्हाधिकारी कार्यालयातून स्पष्ट आदेश नसल्यामुळे पालक, विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे.

दरम्यान, करोना संसर्गामुळे यंदाच्या शैक्षणिक वर्षात अडथळा निर्माण झाल्याने विद्यार्थ्यांना ऑनलाइनच्या माध्यमातून अभ्यास करावा लागत आहे. ऑनलाइनच्या माध्यमातून अभ्यास करताना विद्यार्थ्यांना अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागते. त्यात, दहावीच्या परीक्षेची तारीख जवळ येऊ लागली आहे. यामुळे ठाणे शहरातील अनेक खासगी शाळेत पालकांची संमती घेऊन दहावीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत, अशी माहिती काही व्यवस्थापनांकडून देण्यात आली. तसेच योग्य खबरदारी घेतली जात असल्याचा दावाही करण्यात आला.

सर्व पालकांचे मत घेऊन १ फेब्रुवारीपासून दहावीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. दररोज सकाळी ८ ते ९.३० यावेळेत हे वर्ग घेतले जात आहेत. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने आठवड्यातून दोन दिवस सर्व वर्गखोल्या सॅनिटायझ करण्यात येतात. तसेच एका बाकावर एक विद्यार्थी बसविण्यात येत आहे. सर्व खबरदारी घेऊन दहावीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. – एका खासगी शाळेचे मुख्याध्यापक

जिल्ह्यातील शहरी भागातील शाळा सुरू करण्यासंदर्भात अद्यापही जिल्हाधिकाऱ्यांनी कोणताही निर्णय घेतलेला नाही. तरी, शहरातील काही भागातील शाळांमध्ये दहावीचे वर्ग सुरू करण्यात आले असतील तर, यासंदर्भात त्या शाळांची चौकशी करण्यात येईल. – शेषराव बडे, जिल्हा शिक्षणाधिकारी