‘सूर आणि ताल’ यांची एकमेकांशी जेव्हा गट्टी जमते, तेव्हा संगीत मैफलीला रंग चढून रसिकांचे मनोरंजन होते. शनिवारी रात्री गडकरी रंगायतनमध्ये अशीच सूरतालांची अनोखी जुगलबंदी रसिकांना अनुभवता आली. संगीतात ‘भ’ या अक्षराला खूप महत्त्व आहे. भूप रागापासून सुरू होणारे स्वर भैरवी रागावर येऊन थांबतात आणि रसिकांना मंत्रमुग्ध करतात. मीडिया मॉल या संस्थेने आयोजित केलेल्या भारलेल्या या स्वरांनी भारलेला जन्म हा या कार्यक्रमात त्याचा प्रत्यय आला. कार्यक्रमाची सुरुवात देवीच्या प्रार्थनेने झाली आणि जणू काही सरस्वतीच्या वीणेने वातावरण स्वरमय झाले. कार्यक्रमाची सुरुवात मंदार आपटे आणि प्रणिता दासगुप्ता-देशपांडे यांनी गायलेल्या घनश्याम सुंदरा, श्रीधरा, अरुणोदय झाला या आशादायी गाण्याने झाली. भावगीतांनी नुकतीच नव्वदी पार केली आहे. इतक्या प्रदीर्घ काळ भावगीतांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. भावप्रधान गायकीचे भांडारच मराठी संगीतात उपलब्ध आहे. शब्द जेव्हा मनाला स्पर्श करू लागतात तेव्हा संवादाला विराम देऊन सुरांचा आनंद घेण्याची मजा काही औरच असते. ‘नऊरसांची बांधीलकी, शब्दाची जादू, स्वरांची अणि रसिकांची मैत्री’ या कार्यक्रमादरम्यान उलगडत गेली. स्वर- नाद हा शब्द अगदी सहज कानावर पडतो. नाद जेव्हा निर्माण झाला तेव्हा आजूबाजूच्या वातवरणात स्वरही अगदी सहज निर्माण झाला. ठाणेकर रसिक उत्तम कलेला मनापासून दाद देतात, याचा प्रत्यय प्रवीण शृंगारपुरे आणि निलिमा गोखले यांनी गायलेल्या ‘शुक्रतारा मंदवारा’ या गाण्यानंतर आला. या गाण्याला वन्समोरची दाद प्रेक्षकांकडून मिळाली. धरित्रीच्या कुशीमध्ये बी बियाणं निजली, वर पसरली माती जशी शाल पांघरली या बहिणाबाईंच्या गाण्याने रसिकश्रोते त्यांचा आठवणीतल्या कवितांमध्ये रमले होते. या वेळी ‘अरे घरोटा घरोटा तुझ्यातून पडे पिठी तसं माझं गाणं पोटातून येतं ओठी’ हे गाणे गाऊन निवेदिका दीप्ती भागवत यांनी आपण फक्त अभिनेत्री नसून गायिकाही असल्याचे सभागृहातील रसिकांनी दाखवून दिले. ‘जे वेड मजला लागले’ हे गाणे गायल्यानंतरही रसिकांनी भरभरून दाद दिली. कलाकारांना वादकांची उत्तम साथ मिळणे अतिशय गरजेचे असते, याचा त्रिवेणी संगम या मैफलीत झाला होता. ‘सहज सख्या एकटाच येई सांजवेळी’ या गाण्याला तबल्याची साथ देणाऱ्या निषाद करलगीकर यांनी रसिकांची वाहवा मिळवली. गाणी ऐकताना वेणूची साथ सुरात मिसळते. बासरीचे सूर ऐकल्यानंतर मन प्रसन्न होते. बासरीतून निघणारे स्वर बासरीसारखे सरळ आणि सोपे आयुष्य जगण्याची दिशा देतात, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. प्रसिद्ध बासरीवादक हरिप्रसाद चौरसिया यांचे शिष्य विनोद सेहगल यांनी या भारलेल्या कार्यक्रमात बासरीवादन केले. महाराष्ट्राचे पारंपरिक वाद्य मानल्या जाणाऱ्या ढोलकीवर अनिल गावडे आणि ऑक्टोपॅडवर जितेंद्र गायकर यांनी साथ दिली. त्यानंतर ‘सजणा नको रे बोलू मजसी, बाई मी विकत घेतला श्याम’ या गाण्यांनी प्रेक्षकांनाही टाळ्यांचा ताल धरायला लावला.
कार्यक्रमाचे संयोजन प्रवीण शृंगारपुरे यांनी केले होते. ‘घन घन माळा नभी दाटल्या, कोसळती धारा’ हे गाणे झाल्यानंतर पावसाच्या आठवणीने मळभ दाटले होते. ‘या चिमण्यांनो परत फिरा रे घराकडे आपुल्या’ हे गाणे सादर झाले. अशा प्रकारची एकूण २८ भावगीते या वेळी सादर झाली.
स्वरांचा पाऊस पडतांना शब्दांनाही जाग येते आणि माती जशी ओली होते तसेच शब्दांना भावना प्राप्त होतात. शब्दातील भावना सुरात विरघळल्या की भावगीत तयार होऊन रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवते.