29 September 2020

News Flash

‘स्वच्छ अंबरनाथ, सुंदर अंबरनाथ!’

चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच गुढीपाडव्याला अंबरनाथमध्ये नववर्षांचे स्वागत ‘स्वच्छ अंबरनाथ, सुंदर अंबरनाथ’ने करण्यात येणार आहे. स्वागत यात्रेचे हे १३ वे वर्ष आहे.

| March 3, 2015 12:05 pm

चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच गुढीपाडव्याला अंबरनाथमध्ये नववर्षांचे स्वागत ‘स्वच्छ अंबरनाथ, सुंदर अंबरनाथ’ने करण्यात येणार आहे. स्वागत यात्रेचे हे १३ वे वर्ष आहे. शहरातील स्वच्छतेची समस्या लक्षात घेऊन स्वच्छता अभियान राबवण्यात येणार आहे.
शहरातील स्वामी समर्थ चौकात शहराच्या विविध भागांतून येणाऱ्या तब्बल २५ उपयात्रा एकत्र जमून पुढे शिवाजी चौक मार्गे हुतात्मा चौकात स्वागत यात्रा संपणार आहे. तसेच या वर्षीचे आकर्षण म्हणजे या वर्षी शहरातील बारा महिला मंडळे यात्रेत सहभागी होणार असून ही मंडळे विविध देखावे साजरे करणार आहेत. विशेष म्हणजे यात्रेची पन्नास टक्के जबाबदारी या महिला मंडळांनी घेतली आहे. पुढच्या वर्षी ही संपूर्ण जबाबदारी महिलांवर सोपवली जाणार आहे, असे आयोजकांनी सांगितले. अंबरनाथमध्ये ‘मायभूमीतील’ ढोलपथके स्वागत यात्रेत सहभागी होणार आहेत. मोरया व शिप्रतिष्ठा या ढोलपथकांमध्ये मिळून शहरातील ऐंशी महाविद्यालयीन तरुण सहभागी होणार आहेत. या तरुणांनी या यात्रेसाठी खास स्वकष्टाने ही ढोलपथके उभी केली आहेत.
त्यामुळे यंदा ‘स्वच्छ अंबरनाथ’चा नारा स्वागत यात्रेच्या माध्यमातून बुलंद होणार आहे. दरम्यान, शहरात धिम्या गतीने सुरू असलेल्या भुयारी गटार व रस्ते काँक्रिटीकरणामुळे नववर्ष स्वागत यात्रेला शहराच्या पूर्व व पश्चिम भागात अडथळे निर्माण होणार आहेत. बहुतेक ठिकाणी यात्रा वळवून न्यावी लागणार आहे.
नुकतेच या अपूर्ण कामांच्या विरोधात शिवसेना शहरप्रमुखांनी आंदोलनाचा इशारा पालिकेला दिला आहे.

सशक्त अंबरनाथसाठी नववर्ष स्वागत यात्रेच्या माध्यमातून स्वच्छ व सुंदर अंबरनाथचा आम्ही नारा देणार असून यासाठी दरवर्षीप्रमाणे गुढय़ा न वाटता यात्रेत सहभागी होणाऱ्यांना आम्ही तुळशीची रोपे वाटणार आहोत. या संदेशाच्या माध्यमातून शहराच्या स्वच्छतेची जबाबदारी नागरिकांचीही असल्याची माहिती आम्ही सर्वांपर्यंत पोहोचवणार आहोत.
– रत्नाकर चांदसरकर, सदस्य, नववर्ष स्वागत यात्रा समिती

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 3, 2015 12:05 pm

Web Title: clean ambarnath ambernath beautiful slogan for welcome to new year rally
Next Stories
1 दहावीच्या प्रमाणपत्राअभावी महिलेचे निवृत्ती वेतन रखडवले
2 दादोजी कोंडदेव मैदानात सिंथेटिक ट्रॅक
3 अंबरनाथमध्ये शिवसेनेत धुसफूस
Just Now!
X