पालिका आयुक्तांचे आश्वासन; स्मार्ट सिटीसाठी २८५ कोटींचा निधी

कल्याण : येत्या काळात स्वच्छ व सुंदर शहर, आर्थिक शिस्तीचे पालन आणि सुप्रशासनावर आपला सर्वाधिक भर असणार आहे. शहरात समूह विकास योजना राबवून जुन्या जीर्ण इमारतीमधील रहिवाशांना सुखकर जीवन जगता येईल या दृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत. स्मार्ट सिटीसाठी २८५ कोटींचा उपलब्ध निधी केवळ स्मार्ट प्रकल्पांसाठी वापरण्यात येणार असल्याचे पालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी सांगितले.

कल्याण-डोंबिवली महापालिकेचा १९९७ कोटी ७९ लाख रुपये जमेचा आणि दीड कोटी रुपयांच्या शिलकीचा अर्थसंकल्प आयुक्तांनी शुक्रवारी स्थायी समितीपुढे सादर केला. त्यांनतर ते  बोलत होते.

दर महिन्याला प्रत्येक प्रभागाचे सर्वेक्षण करून स्वच्छ, सुंदरतेमध्ये त्या प्रभागाला गुणांकन देण्यात येईल. वर्षभरात जे प्रभाग गुणांकनात अव्वल ठरतील त्या प्रभाग अधिकारी, कर्मचाऱ्यांचा पालिकेतर्फे सन्मान केला जाईल. नगरसेवकांनी आपला प्रभाग अधिक देखणा, तेथील सेवासुविधा उत्तम ठेवण्यावर भर द्यावा. ओला, सुका कचरा वेगळा करण्यासाठी पुढाकार घ्यावा. असे काम जे नगरसेवक करतील त्यांच्या कामाचे गुणांकन करून त्यांचा स्वातंत्र्यदिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान केला जाणार आहे.

अनावश्यक कामांना कात्री

अर्थसंकल्पात निधी आहे म्हणून नवीन कामे सुरू केली जाणार नाहीत. जमेच्या प्रमाणात कामे हातात घेऊन दायित्वावर नियंत्रण आणले जाईल. नागरिकांचे जीवन सुलभ कशाने होते ही कामे प्राधान्याने हाती घेतली जातील. अनावश्यक उधळपट्टीवर निर्बंध आणले जातील. उपलब्ध निधी पाहून किरकोळ कामांना कात्री लावून वर्षांनुवर्षांची गटार, पायवाटा कामे कमी करून रस्ते रुंदीकरण, उड्डाण पूल, पादचारी पूल, भुयारी गटारे, घनकचरा प्रकल्पांना प्राधान्य देण्यात येणार आहे. मोहिली, आंबिवली परिसरातील गावे अग्रक्रमाने विकसित केली जातील.

क्रीडा

भागशाळा मैदान, सुभाष मैदान, नेहरू मैदान, फडके मैदान येथे बास्केट बॉल कोर्ट, फुटबॉल मैदान विकसित केले जाणार आहे. पालिका शाळांमधील ई लर्निग सुविधेचा दर्जा बदलणार आहे. विद्यार्थ्यांना एकांतात अभ्यास करता यावा म्हणून कल्याण, डोंबिवलीत दोन-दोन अभ्यासिका विकसित केल्या जाणार आहेत. स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन केंद्र सुरू केले जाणार आहे. शेनाळे तलाव पर्यटन स्थळ म्हणून विकसित केले जाणार आहे.

नागरी सुविधा

नागरिकांना घरबसल्या पालिकेच्या सुविधा मिळाल्या पाहिजेत. यासाठी ऑनलाईन सुविधेवर भर देण्यात येणार आहे. पालिकेच्या प्रत्येक विभागाची अत्यावश्यक माहिती पालिका संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली जाईल. या माध्यमातून पालिकेला आयएसओ दर्जा प्राप्त करून घेण्यात येईल. जे कर्मचारी प्रामाणिकपणे, झोकून काम करतात त्यांना कर्मवीर पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

आर्थिक शिस्तीवर भर

अर्थसंकल्पातील उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी वर्षभर आर्थिक शिस्तीवर भर देण्यात येणार आहे. पालिकेचा आर्थिक दर्जा उंचावण्यासाठी नवीन महसुली स्रोत निर्माण करणे, विविध उपाययोजना हाती घेण्यात येणार आहेत. पालिका ताब्यातील मालमत्तांमधून उत्पन्न मिळविणे. वाहन सुविधेतून महसुली स्रोत शोधणे. प्रत्येक अर्थसंकल्पात अशी आश्वासने दिली पण त्याची कार्यवाही झाली नाही.यासाठी पथक नेमण्यात येणार आहे.

रस्त्यांची कामे

  • कोटींची तरतूद  पालिका हद्दीतील रस्ते डागडुजीवर केली आहे.
  •  कल्याण पूर्व, टिटवाळा, आधारवाडी भागातील रस्त्यांचे सौंदर्यीकरण केले जाणार आहे.
  •   कोपर पुलाचे काम वर्षभरात पूर्ण करण्यात येणार आहे.
  • कोटीची तरतूद  मोहने, वालधुनी, ठाकुर्ली येथील उड्डाणपुलांची कामे जलद होण्यासाठी करण्यात आली आहे.
  •  मांडा-टिटवाळा येथील रेल्वे फाटक बंद करून तेथे पूल उभारणीस प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. रिंगरूटला हा पूल जोडण्यात येणार आहे.
  •  मुरबाड रस्ता, बदलापूर जोड वालधुनी नदीस जोडणारे रस्ते विकसित करून उल्हास नदीवर दोन उड्डाण पूल सज्ज करण्यात येणार आहेत.

प्रशासनाने सादर केलेल्या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी कल्याण, डोंबिवली शहरे स्वच्छ, सुंदर, स्मार्ट करण्यावर भर दिला आहे. स्थायी समितीकडून आयुक्तांच्या सर्व विकास प्रकल्पांना सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. ती स्मार्ट होतील यादृष्टीने एकत्रित प्रयत्न केले जातील.

विकास म्हात्रे, सभापती स्थायी समिती