18 February 2019

News Flash

शहर स्वच्छतेसाठी पालिकेची कसोटी

केंद्र शासनाकडून दरवर्षी देशभरातील स्वच्छ शहरांची यादी जाहीर करण्यात येते.

प्रत्यक्ष पाहणीत मिळणाऱ्या गुणांकनाच्या आधारे ठाण्याचे स्वच्छतेमधील नेमके स्थान स्पष्ट होणार

देशभरातील शहरांमधील यंदाच्या स्वच्छता सर्वेक्षणासाठी केंद्र शासनाने तयार केलेल्या ‘स्वच्छता अ‍ॅप’च्या क्रमवारीत १५ दिवसांपूर्वी १८व्या स्थानावर असलेल्या ठाणे शहराने आता राज्यात पहिल्या तर देशात दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. असे असले तरी केंद्र शासनाच्या पथकाकडून शहरातील स्वच्छतेची प्रत्यक्ष पाहणी केली जाणार असून या पाहणीत मिळणाऱ्या गुणांकनाच्या आधारे शहराचे स्वच्छतेमधील नेमके स्थान स्पष्ट होणार आहे. त्यामुळे देशातील स्वच्छ शहरांच्या यादीत अव्वल स्थान मिळविण्याचा चंग बांधलेल्या पालिका प्रशासनाची आता शहरातील स्वच्छतेवर मदार असणार आहे.

केंद्र शासनाकडून दरवर्षी देशभरातील स्वच्छ शहरांची यादी जाहीर करण्यात येते. ही यादी जाहीर करण्यासाठी केंद्राच्या शासनाच्या पथकाकडून सर्वच शहरांमधील स्वच्छतेची प्रत्यक्ष पाहणी करण्यात येते. यंदाही अशाच प्रकारे देशभरातील ४०४१ शहरांमध्ये केंद्र शासनाकडून स्वच्छतेची पाहणी करण्यात येणार असून त्यामध्ये एकटय़ा महाराष्ट्रातील २४६५ शहरांचा समावेश आहे. स्वच्छ शहरांच्या सर्वेक्षणासाठी प्रत्यक्ष पाहणी करण्याबरोबरच ‘स्वच्छता अ‍ॅप’ सुरू करण्यात आले आहे.

शहरातील नागरिकांनी स्वच्छता सर्वेक्षणांमध्ये सहभागी व्हावे या उद्देशातून हा अ‍ॅप सुरू करण्यात आला आहे. या अ‍ॅपवर शहरातील नागरिकांना तक्रारी करण्याची तसेच प्रतिक्रिया नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या अ‍ॅपवरील नागरिकांच्या तक्रारीचा पालिकेकडून होणारा निपटारा तसेच तक्रार निकाली काढल्यानंतर नागरिकांनी व्यक्त केलेले समाधान या आधारे अ‍ॅपवर गुणांकन दिले जातात. पंधरा दिवसांपूर्वी शहरातील ४२ हजारांहून अधिक नागरिकांनी अ‍ॅपवर नोंदणी केली होती. तसेच २८ हजार ५०२ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी  २६ हजार ५५६ तक्रारी निकाली काढल्या होत्या.

त्याचप्रमाणे ६ हजार १९८ म्हणजेच ९१ टक्के नागरिकांनी कारवाईबाबत समाधान व्यक्त केले होते. त्यामुळे मिळालेल्या गुणांकनामुळे ठाणे शहर १८व्या स्थानावर पोहोचले होते. दरम्यान, पंधरा दिवसांनंतर ठाणे शहराने आता राज्यात पहिल्या तर देशात दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे.

९८ टक्के नागरिक समाधानी

ठाणे शहरातील ४७ हजार ५८७ नागरिकांनी केंद्र शासनाच्या ‘स्वच्छता अ‍ॅप’वर नोंदणी केली आहे. त्यापैकी १४ हजार ३२८ नागरिक अ‍ॅपचा वापर करतात, तर ३३ हजार २५९ नागरिक वापर करत नाहीत. या अ‍ॅपवर आतापर्यंत २ लाख १ हजार ४०५ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी १ लाख ९९ हजार ८३७ तक्रारींचा पालिकेने निपटारा केला आहे. १ हजार ५१६ तक्रारी स्वच्छतेसंबंधी नसल्यामुळे पालिकेने त्या नाकारल्या आहेत. ५६ हजार ७५८ नागरिकांनी तक्रारीच्या कारवाईबाबात प्रतिक्रिया नोंदविली असून त्यापैकी ५५ हजार ६७६ म्हणजे ९८ टक्के नागरिकांनी कारवाईबाबत समाधान व्यक्त केले आहे.

First Published on February 8, 2018 2:08 am

Web Title: clean city project tmc