|| प्रकाश लिमये

श्री सालासर राधा वल्लभ सोसायटी, भाईंदर

नव्याने विकसित होत असलेल्या भाईंदर पश्चिम भागातील डी-मार्टच्या पाठीमागे अत्यंत शांत परिसरात ‘श्री सालासर राधा वल्लभ’ गृहसंकुल उभे आहे. स्वच्छतेच्या बाबतीत दक्षता घेणे, सर्वधर्मीय सण उत्साहाने साजरे करणे आणि सौरऊर्जा, पावसाळी पाण्याचे नियोजन, वीजबचतीची उपाययोजना यांमुळे हे संकुल खऱ्या अर्थाने स्मार्ट झाले आहे.

या संकुलाची स्थापना २०१०मध्ये झाली. या संकुलात एकंदर ११७ सदनिका आहेत. कार्यकारिणी समितीचे अध्यक्ष जय मेहता, सचिव प्रशांत गुप्ता आणि कोषाध्यक्ष ओमप्रकाश गुप्ता हे आहेत. त्यांच्यासोबत दोन महिला सदस्यांसह एकंदर सात सदस्य कार्यकारिणीत आहेत.

स्वच्छता हे संकुलाचे ठळक वैशिष्टय़. संकुलात कायम स्वच्छता राहावी यासाठी खासगी व्यवस्थापन कंपनीची (हाऊस कीपिंग) नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचे कर्मचारी आवारातील कचरा उचलणे तसेच परिसराची स्वच्छता ठेवण्याचे काम सतत करत असतात, तसेच ठरावीक कालावधीनंतर संपूर्ण आवार पाण्याने धुऊन स्वच्छ केले जाते. संकुलात बाहेरून नियमित येणाऱ्यांना पान, तंबाखू खाऊन थुंकण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. संकुलात ओल्या आणि सुक्या कचऱ्याचे १०० टक्के वर्गीकरण केले जाते. स्वच्छतेबाबत राबवण्यात येत असलेल्या या उपाययोजनांमुळे मीरा-भाईंदर महापालिकेकडून स्वच्छतेसाठीचे पंचतारांकित मानांकन यंदाच्या वर्षी श्री सालासर राधा वल्लभ संकुलाला बहाल करण्यात आले आहे, तसेच आयसीआयसीआय या बँकेकडून संकुलाला स्वच्छतेचा पुरस्कार प्राप्त झाला आहे.

शासनाने यंदाच्या वर्षी लागू केलेल्या प्लास्टिक बंदीचेही गृहसंकुलात स्वागत करण्यात आले असून महापालिकेने घरातील प्लास्टिक जमा करण्यासाठी दिलेल्या मुदतीत या संकुलातील प्रत्येक घरातील प्लास्टिक महापालिकेकडे जमा होईल याची दक्षता कार्यकारिणी समितीने घेतली.

सुरक्षा व्यवस्थेसाठी संकुलाच्या आवारात तसेच उद्वाहनात मिळून २५ सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. दिवसा ४ आणि रात्री ४ असे सुरक्षा रक्षक आणि त्यांच्यावर निरीक्षक नेमण्यात आले आहेत. घरकामासाठी येणाऱ्या महिलांना संकुलाने ओळखपत्रे दिली आहेत, तसेच एखादा आगंतुक आपल्या उत्पादनांची विक्री करण्यासाठी संकुलात आला तर त्याच्या सोबत सुरक्षा रक्षक संकुलात फिरत असतो.

दरवर्षी संक्रांतीपासून सुरू होणारे विविध धर्माचे सण उत्साहाने संकुलात साजरे केले जातात. गणपती आणि नवरात्र हे सण विशेष करून धूमधडाक्याने साजरे होतात. या सणांच्या सजावटीसाठी लागणारे भाडय़ाचे साहित्य कमीतकमी आणले जाते आणि टाकाऊतून टिकाऊ या धर्तीवर घरातील टाकाऊ वस्तूंपासून सजावट केली जाते.

संकुलाने ३० किलो वॅटचे उत्पादन करणारी सौरऊर्जा यंत्रणा संकुलाच्या गच्चीवर बसवली आहे. मात्र या ऊर्जेचे पॅनल बसवताना पाण्याची टाकी, उद्वाहनाच्या वरील जागा आदींचा वापर केला आहे. त्यामुळे संपूर्ण गच्ची मोकळी राहिली आहे. याद्वारे निर्माण होणारी वीज, वीज कंपनीच्या ग्रीडमध्ये जमा होते आणि संकुलाच्या आवारातील दिवे, पाण्याचे पंप तसेच उद्वाहनासाठी आवश्यक असणारी वीज कंपनीकडून घेण्यात येते. संकुलाची ग्रीडमध्ये जमा होणारी वीज आणि कंपनीकडून मिळणारी वीज याचे मोजमाप करणारे मीटरही बसविण्यात आले आहे.

पावसाळ्यात जमा होणारे पाणी संकुलाच्या आवारातच रिंग वेलमध्ये जमा करण्यात येते. त्यावर पाण्याचे शुद्धीकरण करणारी यंत्रणाही बसवण्यात आली आहे. त्यामुळे त्यातून मिळणारे पाणी हे महापालिकेकडून मिळणाऱ्या पाण्यापेक्षाही अधिक शुद्ध आहे. मात्र तरीही या पाण्याचा पिण्याव्यतिरिक्त इतर कारणांसाठी वापर केला जातो. संकुलात सर्वत्र एलईटी दिवे बसवण्यात आले आहेत. त्यामुळे विजेची मोठी बचत होते. भविष्यात पाणी बचतीसाठी प्रत्येक सदनिकेत स्वतंत्र मीटर बसविण्यात येणार असून मर्यादेपेक्षा जास्त पाणी वापरणाऱ्याला अतिरिक्त शुल्क आकारण्यात येणार आहे. तसेच संकुलात दररोज गोळा होणाऱ्या ओल्या कचऱ्याद्वारे गांडूळ खतनिर्मिती करण्याचाही संकुलाचा मानस आहे.