अंबरनाथमधील नगरसेवकाचा आरोप
नियम डावलून सफाई कामगार सुभाष साळुंखे यांची स्वच्छता निरीक्षकपदावर नियुक्ती करण्यात आली असल्याचा आरोप शिवसेना नगरसेवक उत्तम आयवळे यांनी केला असून या प्रकरणी मुख्याधिकाऱ्यांनी चौकशी करावी, तसेच तोपर्यंत साळुंखे यांना निलंबित करावे, अशी लेखी मागणी केली आहे.
अंबरनाथ नगर परिषदेत १९९७ पासून सुभाष साळुंखे सफाई कामगारपदावर कार्यरत आहेत. त्यांनी एमएससीआयटी आणि स्वच्छता निरीक्षकाचा मराठवाडा बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशनचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. या शैक्षणिक पात्रतेवर त्यांनी २००७ मध्ये स्वच्छता निरीक्षकपदावर पदोन्नती मिळावी, अशी मागणी केली होती. त्यावर जिल्हा प्रकल्प अधिकारी डॉ. विजया कंठे, अंबरनाथ नगरपालिकेचे मुख्याधिकारी विनोद डवले आणि लेखापाल बी. जी. कुमावत यांच्या समितीने सुभाष साळुंखे यांना स्वच्छता निरीक्षक पदावर अंतर्गत भरतीने नेमणूक देण्यास मंजुरी दिली. मात्र नगर परिषद संचालनालयाचे आयुक्त सुनील सोनी यांनी २५ एप्रिल २००६ रोजी काढलेल्या परिपत्रकानुसार स्वच्छता निरीक्षक पदासाठी अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रशिक्षण प्रमाणपत्र असणे बंधनकारक असतानाही साळुंखे यांना पदोन्नती देण्यात आली. त्यामुळे ही पदोन्नती बेकायदेशीर असल्याचा आरोप नगरसेवक उत्तम आयवळे यांनी केला आहे.
मात्र अशा मागणीमुळे इतरही पदोन्नती तपासण्याची मागणी पुढे येत आहे. या प्रकरणी पालिकेचे मुख्याधिकारी गणेश देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता, याबाबत चौकशीचे आदेश उपमुख्याधिकारी श्रीरंग गोडबोले यांना दिले असून, एखादा अभ्यासक्रम पदोन्नतीसाठी ग्राह्य़ धरला जाऊ शकतो का, या निकर्षांची चौकशी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.