मीरा-भाईंदरमधील वाढत्या डासांच्या पाश्र्वभूमीवर आदेश

वाढत्या डासांमुळे मीरा-भाईंदरचे रहिवासी त्रस्त झाल्याने शहरातील गटारे व नाल्यांची युद्धपातळीवर साफसफाई करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश महापौर गीता जैन यांनी आयुक्तांना दिले आहेत.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा डासांची संख्या खूपच वाढली आहे. गटारांची साफसफाई व औषध फवारणी योग्य पद्धतीने होत नसल्याने डासांची पैदास मोठय़ा प्रमाणावर होत असल्याचा आरोप केला जात आहे. औषधांच्या दर्जाबाबतही प्रश्न उपस्थित केला जात आहे. डासांच्या या त्रासाबद्दल ‘लोकसत्ता वसई’ने सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते. या पाश्र्वभूमीवर शहरातील वरिष्ठ नागरिकांनी महापौरांची भेट घेऊन डासांचा बंदोबस्त करण्यासाठी काही सूचना केल्या. या सूचनांची दखल घेऊन महापौर गीता जैन यांनी प्रशासनाकडून सुरू असलेल्या कार्यवाहीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. शहरातील गटारांची दैनंदिन सफाई व औषध फवारणी करून त्याचा अहवाल सादर करण्यात यावा तसेच याबाबत स्थानिक नागरिकांना विश्वासात घेण्यात यावे, असे आदेश महापौरांनी दिले आहेत.