नालासोपाऱ्यातील सफाई कर्मचारी मृत्यूनंतर जिल्हाधिकाऱ्यांची कार्यवाही

नालासोपारा येथील घटनेनंतर करण्यात येत असलेल्या कार्यवाहीबाबत माहिती पालघर जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी सादरीकरणाद्वारे दिली. सफाई कर्मचाऱ्यांची संबंधित यंत्रणांमार्फत नियमित आरोग्य तपासणी तसेच त्यांच्यात जागृती करण्याबाबत कार्यवाही करण्यात येत असून त्यांना  कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी विविध ठिकाणी शिबिरांचे आयोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. सफाई कर्मचाऱ्यांशी संबंधित सर्व विषयांचा आढावा घेण्यासाठी सर्व यंत्रणांची लवकरच एक बैठक घेण्यात येईल, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.

राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोग सदस्य हाथीबेड सोमवारी हे पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्या वेळी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सफाई कर्मचाऱ्यांबाबतच्या योजनांचे सादरीकरण करण्यात आले. या वेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या स्तरावर एक देखरेख समिती आणि महानगरपालिका स्तरावर समन्वय समिती तयार करून यापुढे अशा घटना घडू नयेत याबाबत दक्षता घेण्याची सूचना करण्यात आली.

कर्मचाऱ्यांसाठी हाथीबेड यांची घोषणा

  • सफाई कर्मचाऱ्यांमध्येही स्वत:विषयी जागृती निर्माण होण्यासाठी एक चित्रफीत तयार करून त्यांना दाखविण्यात येणार आहे.
  • याव्यतिरिक्त सफाई कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा भरण्याची कार्यवाही तातडीने करावी, कंत्राटी कामगारांना लागू असलेले वेतन पूर्णपणे मिळेल याची दक्षता घ्यावी, कर्मचाऱ्यांची दर तीन महिन्यांनी आरोग्य तपासणी व्हावी
  • महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळामार्फत त्यांना कर्ज उपलब्ध करून द्यावे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य योजनेअंतर्गत जिल्हाधिकारी यांनी जागा उपलब्ध करून देऊन २५ वर्षे सेवा पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना घरे उपलब्ध करून द्यावीत.