कचरा न उचलला गेल्याने वसईकरांची नाराजी

वसईच्या नवघर विभागातील सफाई कर्मचाऱ्यांनी शुक्रवार सकाळपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. पालिकेने किमान वेतन देण्याचे मंजूर करूनही न दिल्याने त्यांनी हे आंदोलन केले आहे. सकाळपासून शहरातला कचरा न उचलला गेल्याने आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

वसई-विरार महापालिकेत सफाई कर्मचारी हे ठेका पद्धतीने काम करतात. ठेकेदारांकडून त्यांना नऊ हजार रुपये मासिक वेतन दिले जाते. परंतु या सफाई कर्मचाऱ्यांना भत्ते मिळून १४ हजार ८०० रुपयांचे वेतन देण्याचा शासकीय निर्णय झालेला आहे. २२ जानेवारी रोजीच नगररचना विभागाने याबाबतचा अध्यादेश लागून केला होता. परंतु वसई-विरार महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना अद्याप किमान वेतन मिळत नाही. मीरा-भाईंदरच्या सफाई कर्मचाऱ्यांना किमान वेतन मिळत असताना आम्हाला का मिळत नाही़, असा सवाल या सफाई कर्मचाऱ्यांनी केला. याच मागणीसाठी शुक्रवार सकाळपासून त्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले. सकाळी नवघर माणिकपूर मुख्याल्याच्या बाहेर कर्मचाऱ्यांनी जमून घोषणाबाजी करीत आंदोलन केले. ठेकेदार अरेरावी करीत असून आमच्या हातात नऊ हजार रुपये टेकवत आहे. मग आम्ही का काम करावे, असा सवाल कामगारांचे नेते सागर सोलंकी यांनी केला आहे.  नवघर-माणिकपूर विभागात ४३५ सफाई कर्मचारी आहेत. तीन पाळ्यांमध्ये कचरा उचलण्याचे काम चालते. पहिल्या पाळीत कुणीच काम केले नसल्याने दररोजचा कचरा उचलला गेलेला नव्हता. दुपारी अन्य विभागातील कर्मचारीदेखील त्यांना सामील झाले. स्थायी समिती सभापती नितीन राऊत आणि प्रभाग समिती सभापती प्रकाश रॉड्रिक्स यांनी आंदोलक कर्मचाऱ्यांची भेट घेऊन त्यांना समजाविण्याचा प्रयत्न केला, परंतु कर्मचारी आपल्या निर्णयावर ठाम होते.

दरम्यान, पर्यायी व्यवस्था म्हणून इतर विभागातले सफाई कर्मचारी पाठवून काम करणार आहोत, असे नवघर माणिकपूर विभागाचे आरोग्य निरीक्षक जितेंद्र नाईक यांनी सांगितले. पालिकेकडे १२३ कायमस्वरूपी सफाई कर्मचारी आहेत. परंतु त्यांना इतर विभागात बदली करण्यात आल्याने कंत्राटी सफाई कामगारांवर अवलंबून राहावे लागते.

किमान वेतन देण्याचा निर्णय पालिकेने मंजूर केलेला आहे. केवळ स्थायीच्या बैठकीत खर्चाला मान्यता द्यायची बाकी आहे. येत्या स्थायीच्या बैठकीत त्याला मंजुरी दिल्यानंतर सर्व सफाई कर्मचाऱ्यांना किमान वेतन मिळणार आहे.

– नितीन राऊत, सभापती, स्थायी समिती