श्रमजीवी संघटनेची मागणी; कामगारांच्या सन्मानासाठी पालिकेवर धडकमोर्चा

कामगारांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या श्रमजीवी संघटनेने आता कामगारांच्या सन्मानाची लढाई सुरू केली आहे. सफाई कामगारांना यापुढे आरोग्यसेवक असे संबोधण्यात यावे, अशी मागणी श्रमजीवी संघटनेने केली असून या मागणीसाठी नुकताच वसई-विरार महापालिकेवर मोर्चाही काढण्यात आला.

स्थानिक स्वराज्य संस्थेतील कंत्राटी कामगारांना किमान वेतन मिळावे यासाठी श्रमजीवी संघटनेने आंदोलन सुरू केले होते. त्यांच्या मागणीला यश येऊन कंत्राटी कामगारांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन मिळू लागले आहे. मात्र अद्यापि आरोग्य, परिवहन, अग्निशमन, पाणीपुरवठा येथील कंत्राटी कामगारांना किमान वेतन कायदा लागू झालेला नाही. यासाठी श्रमजीवी संघटनेने वसई-विरार महापालिका मुख्यालयावर मोर्चा काढला होता.

या वेळी सफाई कर्मचाऱ्यांना आरोग्यसेवक म्हणून संबोधले जावे अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत बोलताना श्रमजीवी संघटेनेचे अध्यक्ष विवेक पंडित यांनी सांगितले की, पालिकेचा सफाई विभाग हा आरोग्य विभागामार्फत चालवला जातो. कामगारांनी सफाई केल्यामुळेच शहरात स्वच्छता नांदते आणि त्यामुळे नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहते, शहर रोगराईमुक्त होते. त्यामुळे त्यांना सफाई कामगार न म्हणता आरोग्यसेवक म्हणायला हवे असे ते म्हणाले.

या मागणीचे निवेदन पालिका आयुक्तांना देण्यात आले आहे. किमान वेतन, निर्वाह भत्ता तसेच इतर मंजूर लाभ कामगारांना मिळायला हवेत आदी मागण्याही या वेळी करण्यात आल्या.