ठाण्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इमारतीला झळाळी

राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्या दौऱ्याची चाहूल लागताच ठाण्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय आणि आसपासचा परिसर झळाळून गेला आहे. गेल्या शनिवारी चंद्रकांतदादा येणार असे समजताच धुळीने सदैव माखलेल्या या इमारतीची केवळ साफसफाईच नव्हे तर रंगरंगोटीही रातोरात करण्यात आली. प्रत्यक्षात बांधकाममंत्री आलेच नाहीत. परंतु, त्यांच्या चाहुलीनेच कार्यालयाचे रूपडे पालटल्यामुळे येथे काम करणारे कर्मचारी मात्र खूश झाले.

ठाणे शहरातील मुख्य बाजारपेठेस लागून असलेले सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय गेल्या अनेक वर्षांपासून असुविधेच्या गर्तेत सापडले आहे. जिल्ह्य़ातील रस्त्यांचे रुपडे पालटविण्याची भाषा करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या कार्यालयाची अवस्था लगतच असलेल्या इतर सरकारी कार्यालयांपेक्षाही बिकट दिसून येत होती. विभागाच्या प्रवेशद्वारापासूनच खड्डे, दगड, धूळ यांचा सामना करत कार्यालय गाठावे लागत होते. त्यातच बांधकाम विभागाचे लावण्यात आलेले फलक तर तुटलेच होते शिवाय ओल धरलेल्या इमारतीतील प्लॉस्टर कधीही अंगावर कोसळेल अशी परिस्थिती होती. कार्यालयाच्या आवारात शिरताच बेशिस्त पद्धतीने आखणी असलेले वाहनतळ, दुर्गंधीयुक्त स्वच्छतागृह, आतील मुख्यालय इमारतीजवळ अस्ताव्यस्त ठेवण्यात आलेल्या कुंडय़ा आणि रोपे बकाल अवस्थेत होती. तसेच महत्त्वाच्या अधिकाऱ्यांच्या कार्यालयातील काही वातानुकूलित यंत्र बंदावस्थेत होते.

शनिवारच्या पूर्वसंध्येला मात्र या सगळ्यात बदल घडला आणि कार्यालयाचे नशीब पालटले.  सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री चंद्रकांत पाटील येणार असल्याची माहिती या अधिकाऱ्यांना गुरुवारी मिळाली आणि येथे एकच धावपळ उडाली. गुरुवार आणि शुक्रवार अशा दोन दिवसात कार्यालयाच्या परिसरातील रस्ता चकाचक करण्यात आला. पार्किंगसाठी लावण्यात येणाऱ्या वाहनांसाठी पांढऱ्या रंगाचे पट्टे मारण्यात आले. बांधकाम विभागाच्या मुख्य इमारतीला रंगकाम करण्यात आले. तुटलेल्या अवस्थेत असलेल्या कुंडय़ा बदलल्या. शौचालयातही स्वच्छता करण्यात आली. रातोरात झालेल्या या बदलांमुळे सोमवारी कामावर रुजू झालेल्या विभागातील इतर कर्मचाऱ्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. दादांच्या विशेष बैठकीसाठी कोर्ट नाका येथील विश्रांतीगृहही चकाचक केले. गेले कित्येक महने बारगळलेली ही कामे पूर्ण करण्यात आली. परंतु शनिवारी मंत्री महोदय आलेच नाहीत. त्यामुळे दादांना खूश करण्याचा वरिष्ठ अधिकाऱ्यांचा बेत फसला. पण कार्यालयाचे रूपडे पालटल्याने समाधानाचे वातावरण आहे.

मंत्र्यांच्या आदेशांची अंमलबजावणी

सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अनेक प्रकल्पाची यादी येत असते. त्यामुळे हे काम दिवसेंदिवस मागे पडत होते. काही दिवसांपूर्वी काही कर्मचाऱ्यांनी चंद्रकांत पाटील यांना कार्यालयाच्या दयनीय अवस्थेबद्दल माहिती दिली होती. त्यानंतर मंत्रीमहोदयांनीच कार्यालयाच्या नूतनीकरणाचे आदेश संबंधितांना दिले होते. त्यामुळे त्यांच्या दौऱ्यापूर्वी ही कामे करण्यात आली, अशी माहिती या ठिकाणी कार्यरत असलेल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.