२८ हजार ५०२ तक्रारी दाखल; तातडीने निराकरण केल्याचा पालिकेचा दावा

देशभरातील शहरांमधील यंदाच्या स्वच्छता सर्वेक्षणासाठी केंद्र शासनाने तयार केलेल्या ‘स्वच्छता अ‍ॅप’ वर ४२ हजारांहून अधिक ठाणेकरांनी आतापर्यंत नोंदणी केली असून २८ हजार ५०२ तक्रारी नोंदविण्यात आल्या आहेत. या अ‍ॅपवरील तक्रारींचा तात्काळ निपटारा केल्याचा पालिकेचा दावा असून त्याबद्दल ठाणेकरांनी समाधान व्यक्त केले आहे. केंद्र शासनाकडून अ‍ॅपवर दिल्या जाणाऱ्या गुणांकनामुळे देशभरातील प्रगतशील शहरांच्या यादीत ठाणे शहर १८ व्या क्रमांकावर आले आहे.

केंद्र शासनाकडून दरवर्षी देशभरातील स्वच्छ शहरांची यादी जाहीर करण्यात येते. गेल्यावर्षी पहिल्या १०० स्वच्छ शहरांतही ठाण्याला स्थान मिळाले नव्हते. स्वच्छतेच्या यादीत शहराची घसरण झाल्याने महापालिकेवर टीका झाली होती. या पाश्र्वभूमीवर यंदाच्या स्वच्छता यादीमध्ये देशभरातील शहरांमध्ये पहिला क्रमांक पटकाविण्यासाठी पालिकेने प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी शहरामध्ये विविध कार्यक्रम राबविण्यात येत असून त्यातून स्वच्छतेचा संदेश दिला जात आहे. शहरामध्ये मोठे फलकही लावण्यात आले आहेत. स्वच्छता सर्वेक्षण अभियानामध्ये नागरिकांनाही सहभागी होता यावे यासाठी केंद्र शासनाने स्वच्छता अ‍ॅप सुरू केले आहे. या अ‍ॅपवर नागरिकांना शहरातील स्वच्छतेसंबंधी तक्रारी करण्याची सुविधा देण्यात आली आहे. अ‍ॅपवर नोंदविलेल्या तक्रारीबाबत प्रतिक्रिया नोंदविण्याची सुविधाही आहे.

अ‍ॅपवर होणारी नागरिकांची नोंदणी, दाखल होणाऱ्या तक्रारींचा निपटारा आणि तक्रारीवरील कारवाईसंबंधी नागरिकांनी नोंदविलेली प्रतिक्रिया या आधारे गुणांकन देण्यात येते. या गुणांकनानुसार देशातील शहरांमध्ये ठाणे शहर १८ व्या स्थानावर आहे. २० डिसेंबर रोजी गुणांकनानुसार शहर २७ व्या क्रमांकावर होते, अशी माहिती सूत्रांनी दिली.

स्वच्छता अ‍ॅपवर नोंदणी केलेल्या ४२ हजार ७५१ नागरिकांपैकी ९ हजार ४६० नागरिक अ‍ॅपचा सातत्याने वापर करत आहेत. तर उर्वरित ३३ हजार २९१ नागरिक अ‍ॅपवर फारसे कार्यरत नाहीत. अ‍ॅपवरील तक्रारींवर केलेल्या कारवाईसंबंधी ६ हजार ७७० नागरिकांनी प्रतिक्रिया नोंदविल्या आहेत. त्यापैकी ६ हजार १९८ म्हणजेच ९१ टक्के नागरिकांनी कारवाईबाबत समाधान व्यक्त केले. १४८ नागरिकांनी तटस्थ प्रतिक्रिया नोंदविली आहे तर ४२४ जणांनी मात्र कारवाईबाबत असमाधान व्यक्त केले.

२६ हजार तक्रारी निकाली

केंद्र शासनाच्या स्वच्छता अ‍ॅपवर ठाणे शहरातील ४२ हजार ७५१ नागरिकांनी नोंदणी केली आहे. जानेवारीअखेपर्यंत शहराला ४० हजार नोंदणीचे लक्ष्य देण्यात आले होते. मात्र, मुदतीपूर्वीच पालिकेने हे उद्दिष्ट पार केले आहे. या अ‍ॅपवर शहरातील नागरिकांनी स्वच्छतेसंबंधी आतापर्यंत २८ हजार ५०२ तक्रारी नोंदविल्या असून त्यापैकी २६ हजार ५५६ तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत. उर्वरित एक हजार ९४१ तक्रारी स्वच्छतेसंबंधी नसल्यामुळे त्या नाकारण्यात आल्या आहेत.