सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्यास, थुंकल्यास दंडात्मक कारवाई; वसई-विरार महानगरपालिकेचा निर्णय

रस्त्यावर कचरा टाकणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे आता नागरिकांना महाग पडणार आहे. सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय वसई-विरार महापालिकेने घेतला आहे. शहर स्वच्छतेसाठी महापालिकेने हा निर्णय घेतला असून विविध माध्यमांतून नागरिकांमध्ये जनजागृतीही करण्यात येत आहे.

सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्यामुळे अनेकदा आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. रस्त्यावर कचरा साचल्यानंतर दरुगधी निर्माण होते आणि त्याचा त्रास नागरिकांना होतो. अनेक दुकानदारही दुकानातील कचरा रस्त्यावर टाकतात. आता मात्र याकडे महापालिका कर्मचारी, आरोग्य विभाग आणि अधिकाऱ्यांचे लक्ष राहणार आहे. महापालिकेने कचरा टाकणाऱ्या, थुंकणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांकडून १५० रुपये आणि थुंकणाऱ्यांकडून १०० रुपये दंड वसूल केला जात आहे. ही मोहीम अधिक तीव्रपणे पालिका राबवणार असून एकूण नऊ प्रभागात याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. यासाठी महापालिकेचे सॅनेटरी इन्स्पेक्टर आणि डेप्युटी सॅनेटरी इन्स्पेक्टर यांच्यामार्फत कारवाई केली जाणार आहे. महापालिकेच्या नऊ प्रभागांमध्ये त्यासाठी स्वच्छतादूत (क्लीनअप मार्शल) नेमण्यात येणार आहे, असे अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी सांगितले.

ठेकेदारांवर कारवाईचा बडगा

वसई-विरार शहरात पालिकेकडून कचरा उचलला जात नाहीत, अशा तक्रारी वारंवार येत होत्या. मुख्यत: नालासोपारा पूर्व, वसई पूर्व यांसह अन्य ठिकाणी मुख्य रस्त्याच्या कडेला, गल्लीबोळात कचरा साठला जात आहे. याबाबत आयुक्त सतीश लोखंडे यांनी पालिका अधिकारी आणि ठेकेदारांना धारेवर धरले होते. अस्वच्छतेबाबत गंभीर दाखल घेत पालिका प्रशासनाने जुने ठेकेदार काढून त्या जागी नवीन ठेकेदार नेमले आहेत. त्यांना पालिकेच्या नऊ प्रभाग समित्यांचा सफाई ठेका देण्यात आला असून त्यांना स्वच्छतेबाबतच्या योग्य त्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर त्यांना ज्या ठिकाणाचा सफाई ठेका दिला जाईल, त्या ठिकाणी जर अस्वच्छता आढळून आली तर अशा ठेकेदारांवर पालिका नियमाप्रमाणे कारवाईचा बडगा उगारणार आहे, असे अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी सांगितले.

सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्यास, थुंकल्यास अशा नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. पालिकेकडून दंडात्मक कारवाई करण्याची वेळ कोणत्याही नागरिकावर येऊ नये. त्यामुळे शहर स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे.

संजय हेरवाडे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका