|| विजय राऊत

दुकाने बंद असल्याने कर्ज काढून भरलेले साहित्य पडून

कासा :  अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने बंद करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे पालघर जिल्ह्यातील कापड दुकानंदारावर उपासमारीची वेळ आली आहे. गेल्यावर्षीही याच काळात टाळेबंदी झाल्याने त्यांचे मोठा आर्थिक फटका बसला होता. कर्ज काढून लग्नाच्या बस्त्याचे साहित्य दुकानदारांनी मागवले आहे, पण आता ते खरेदी कोण करणार असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे.

गेल्या वर्षी लग्न समारंभ झाले नव्हते, त्यामुळे या वर्षी मोठ्या प्रमाणात व्यवसाय होण्याची आशा दुकानदारांना होती. परंतु अचानक करोनाचे रुग्ण वाढल्याने, पालघर जिल्ह्याामध्ये दुकाने बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे आता कापड दुकानंदारावर आणि दुकानात काम करणाऱ्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. दुकानदारांनी उसनवारीने आणि बँकांकडून व्यवसायासाठी कर्ज घेत साहित्य दुकानात भरले आहे. यातील अनेक दुकानदारांची दुकाने ही भाड्याने आहेत. हे भाडे कसे द्यायचे हा प्रश्न त्याच्यासमोर आहे. लग्नसराईत तरी दुकानांवरील निर्बंध हटवावेत अशी मागणी दुकानदारांकडून होत आहे. आम्ही सर्व नियम पाळू पण दुकाने सुरू करा नाही तर नुकसानभरपाई द्या अशी मागणी दुकानदार करीत आहेत.

लग्नसराई असल्याने लहान दुकानदार साधारणपणे १० ते १२ व  मोठे दुकानदार ५० ते ६० लाखांचा माल भरतात. नऊ वार, सहा वार , काठपदर अशा साड्यांची मोठ्या प्रमाणात विक्री होते , तर आलेल्या पाहुण्यांचा सत्कार करण्यासाठी, टॉवेल, रुमाल यांची ही विक्री मोठ्या प्रमाणात होते. ग्रामीण भागातील एका लग्नासाठी साधारणपणे ५० ते ६० हजारांची खरेदी (बस्ता) होते, तर शहरी भागामध्ये दीड ते दोन लाखपर्यंत खरेदी केली जाते. आता दुकानेच बंद असल्याने माल पडून राहणार आहे. त्यामुळे कापड दुकानदारांवर आणि कामगारावर उपासमारीची वेळ आली आहे.

लग्नसराईच्या काळात मोठ्या प्रमाणात व्यवसाय होतो. वर्षभरातील अर्धा व्यवसाय हा याच काळात होतो. गेल्या वर्षी टाळेबंदी आणि या वर्षीही टाळेबंदी असल्याने कर्ज मोठ्या प्रमाणात वाढले आहे. दुकान बंद ठेवून खायचे काय, माल खरेदीसाठी घेतलेले कर्ज कसे फेडायचे हे प्रश्न आमच्यासमोर आहेत. शासनाने कपड्यांची दुकाने चालवण्याची परवानगी द्यावी किंवा आम्हाला आर्थिक मदत तरी करावी. – पपु बारी, कापड दुकानदार, कासा