18 July 2019

News Flash

ठाण्यात समूह पुनर्विकासाला वेग

कोपरी, राबोडी, हाजुरी आणि लोकमान्यनगर भागातील सर्वेक्षणाचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे.

(संग्रहित छायाचित्र)

किसननगरचे सर्वेक्षण आजपासून; कोपरी, राबोडी, हाजुरी, लोकमान्यनगरची प्राथमिक यादी प्रसिद्घ

ठाणे :  समूह पुनर्विकास योजना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी ठाणे महापालिका प्रशासनाकडून गेल्या काही महिन्यांपासून जोरदार हालचाली सुरू आहेत. टेकडी बंगला परिसरात बायोमेट्रीक सर्वेक्षण सुरू असून किसननगर भागात १२ मार्चपासून सर्वेक्षण सुरू केले जाणार आहे. त्यानंतर दोन्ही भागांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात येतील, असे महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले.

कोपरी, राबोडी, हाजुरी आणि लोकमान्यनगर भागातील भोगवटाधारकांची प्राथमिक यादी हरकती आणि सूचनांसाठी प्रसिद्घ करण्यात आली आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील चाळी, झोपडय़ा, धोकायदायक तसेच बेकायदा बांधकामांसाठी समूह पुनर्विकास योजना राबविण्यात येणार आहे. राज्य शासनाने ही योजना राबविण्यास हिरवा कंदील दाखविल्यानंतर महापालिका प्रशासनाने ४३ नागरी पुनरुत्थान आराखडे तयार केले होते. त्यापैकी कोपरी, राबोडी, हाजुरी, लोकमान्यनगर, किसननगर आणि टेकडी बंगला हे सहा आराखडे उच्चाधिकार समितीने मंजूर केले होते. या सहा ठिकाणी पहिल्या टप्प्यात योजना राबविण्यात येणार असून ती प्रत्यक्षात उतरविण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून प्रशासनाने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत.

कोपरी, राबोडी, हाजुरी आणि लोकमान्यनगर भागातील सर्वेक्षणाचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे. त्या आधारे भोगवटाधारकांची यादी प्रशासनाने हरकती व सूचनांसाठी प्रसिद्ध केली आहे. या याद्या प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसांत आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करण्याचे आवाहन महापालिकेने भोगवटाधारकांना केले आहे. ज्या बांधकामाची नोंद प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्राथमिक यादीमध्ये तसेच आराखडय़ामध्ये नाही, अशा बांधकामधारकांनी यादीमध्ये नोंद करण्यासाठी प्रभाग समिती कार्यालयातील क्लस्टर कक्षामध्ये आवश्यक ती कागदपत्रे आणि पुराव्यांसहीत अर्ज करावा, असेही प्रशासनानी सांगितले आहे.

मालमत्ता कराचे पुरावे अनिवार्य

भोगवटादारांच्या अंतिम यादीमध्ये नाव समाविष्ट होण्यासाठी ४ मार्च २०१४ पूर्वीच्या मालमत्ता कर आकारणीचा पुरावा आणि वास्तव्याचा पुरावा सादर करणे आवश्यक आहे. तसेच भोगवटादाराने मालमत्ता कर आणि पाणी देयक पूर्ण भरलेले असणे आवश्यक आहे. अन्यथा भोगवटादाराचा समावेश अंतिम पात्रता यादीत होणार नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. ज्या भोगवटाधारकांची नावे प्राथमिक यादीत आहेत आणि ज्यांचे बायोमेट्रीक सर्वेक्षण झालेले नाही. त्यांनी सर्वेक्षणासाठी वास्तव्याच्या पुराव्यासह प्रभाग समिती कार्यालयातील क्लस्टर कक्षात उपस्थित रहावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.

अधिकृत इमारतींचा समावेश नाही

हाजुरी भागातील अधिकृत इमारतींचा क्लस्टर योजनेत समावेश केल्यामुळे या भागातील नागरिकांनी विरोध दर्शविला होता. महापालिकेच्या अभिलेखानुसार अधिकृत इमारतींमधील रहिवाशांचा प्राथमिक यादीत समावेश नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तसेच या रहिवाशांना क्लस्टर योजनेत समाविष्ट होण्याची इच्छा असेल तर त्यांनी संमतीपत्रासह अर्ज करावा, असेही प्रशासनाने स्पष्ट केले.

First Published on March 12, 2019 3:42 am

Web Title: cluster redevelopment get speed in thane