आयुक्त जयस्वाल यांचे चोख प्रत्युत्तर

ठाणे : गेल्या दोन दिवसांपासून बहुचर्चित समूह पुनर्विकास (क्लस्टर) योजनेसंदर्भात उलटसुलट चर्चा सुरू असून ही योजना कोणत्याही एका राजकीय पक्षाची नसून शहराचा कायापालट करण्यासाठी आणि गोरगरीब जनतेला न्याय देण्यासाठी आहे, असे चोख प्रत्युत्तर आयुक्त संजीव जयस्वाल यांनी ठाणे भाजपला दिले.

येत्या ६ फेब्रुवारी रोजी ठाण्यातील विविध विकासकामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी पाहणी दौरा केला. या वेळी माध्यमांशी बोलताना आयुक्तांनी हे स्पष्टीकरण दिले.

ठाण्यातील समूह पुनर्विकास योजनेबाबत सोमवारी ठाण्यातील भाजप पदाधिकाऱ्यांतर्फे पत्रकार परिषद घेण्यात आली होती. या वेळी भाजप पदाधिकाऱ्यांतर्फे शिवसेना आणि महापालिकेवर समूह पुनर्विकास योजनेबाबत विविध आरोप करण्यात आले होते. तसेच या योजनेला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात मान्यता मिळाली होती. मात्र फडवीसांना यांना कार्यक्रमाचे आमंत्रण देण्यात आले नसल्याचे या वेळी भाजप पदाधिकाऱ्यांकडून सांगितले होते.

भाजपच्या या पत्रकार परिषदेमुळे शहरात शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे असा वाद निर्माण होऊ नये यासाठी आयुक्त संजीव जयस्वाल यांनी भाजपच्या या प्रश्नांना उत्तरे देत क्लस्टर योजना ही कोणत्याही एका पक्षाची नसून गोरगरिबांना न्याय देणारी आहे, असे त्यांनी या वेळी स्पष्ट केले आहे. तसेच या योजनेबाबत कोणतेही गैरसमज असल्यास महापालिका प्रशसानासोबत चर्चा करावी आणि गैरसमज दूर करावेत, असेही त्यांनी या वेळी सांगितले.

योजना बेकायदेशीर असल्यास सिद्ध करा

पुनर्विकास योजनेला राज्य शासनाने अद्याप अंतिम मंजुरी दिलेली नसल्याने मंजुरीआधीच उद्घाटनाची लगीनघाई कशासाठी, असा प्रश्न भाजपचे शहराध्यक्ष निरंजन डावखरे यांनी उपस्थित केला होता. या प्रश्नावर आयुक्तांनी मंगवारी उत्तर दिले. पुनर्विकास योजनेची सर्व परवानगी महापालिकेकडे असल्यानेच आम्ही कामाला सुरुवात करीत आहोत, असे आयुक्तांनी या वेळी स्पष्ट केले. त्यामुळे पुनर्विकास योजना बेकायदेशीर असल्याचे ज्यांनी सांगितले, त्यांनी ते स्पष्ट करावे, असे आवाहनही आयुक्तांनी या वेळी केले.