News Flash

समूह पुनर्विकासाला सुरुंग

शहरी भागात ही योजना राबवण्यात येणार असली तरी, त्याची अंमलबजावणी कशी होणार, याबाबत संभ्रम कायम आहे.

ग्रामस्थांच्या विरोधापुढे सत्ताधारी शिवसेनेची शरणागती; गावठाण परिसराला वगळणार

ठाणे महापालिका क्षेत्रातील बेकायदा बांधकामे, धोकादायक इमारती, गावठाण परिसर, कोळीवाडे यांचा समूह पुनर्विकास करून योजनाबद्ध शहराची आखणी करण्याच्या पालिका प्रशासनाच्या हेतूंना सत्ताधारी शिवसेनेनेच सुरुंग लावला आहे. गावठाण परिसरातील मोठमोठय़ा बांधकामांवर पाणी सोडण्यास नकार देत समूह पुनर्विकास योजनेला विरोध करणाऱ्या ग्रामस्थांपुढे शरणागती पत्कारत ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी गावठाण आणि कोळीवाडा भागापुरती ही योजना प्रलंबित ठेवण्याची भूमिका बुधवारी जाहीर केली. शहरी भागात ही योजना राबवण्यात येणार असली तरी, त्याची अंमलबजावणी कशी होणार, याबाबत संभ्रम कायम आहे.

ठाणे महापालिका स्थानपनेनंतर ग्रामपंचायत काळातील बांधकामे अधिकृत करण्यासंबंधीचे कोणतेही धोरण राबविण्यात आलेले नसल्याने बेकायदा ठरलेल्या या बांधकामांचा समावेश समूह पुनर्विकास योजनेत करण्यात आला आहे. गावठाण आणि कोळीवाडा भागात घरांचे क्षेत्रफळ एक हजार चौरस फुटांच्या पुढे आहे. मात्र, समूह पुनर्विकास योजनेत त्यांना केवळ ३२३ चौरस फुटांचे घर मिळणार आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून ग्रामस्थांनी या योजनेस कडाडून विरोध करण्यास सुरुवात केली आहे. या विरोधासाठी गावठाण आणि कोळीवाडे भागातील रहिवाशांकडून बैठका घेण्यात येत आहेत. तसेच या योजनेस ग्रामस्थांनी लेखी हरकती महापालिकेकडे नोंदविल्या आहेत. या योजनेतून गावठाण आणि कोळीवाडे वगळण्याची मागणी काँग्रेस पक्षाकडून करण्यात आली असून त्यापाठोपाठ सत्ताधारी शिवसेनेनेच्या आणि राष्ट्रवादीच्या लोकप्रतिनिधींही गावठाण आणि कोळीवाडे वगळण्याची मागणी केली होती. त्यामुळे ही योजना होणार की नाही, याविषयी संभ्रमाचे वातावरण होते. असे असतानाच बुधवारी ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन या योजनेबाबत भुमिका स्पष्ट केली.

ग्रामस्थांच्या विरोधाच्या पाश्र्वभूमीवर गावठाण आणि कोळीवाडा भागात राबविण्यात येणारी समूह पुनर्विकास योजना प्रलंबित ठेवण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. नागरिकांच्या हितासाठीच समूह पुनर्विकास योजना राबविली जात असून काही गैरसमजीमुळे योजनेस ग्रामस्थांकडून विरोध होऊ लागला आहे. काही व्यक्तींकडून योजनेबाबत गैरसमज पसरविले जात आहेत. मात्र, ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधी किंवा पालिका प्रशासनाकडून ही योजना व्यवस्थित समजून घ्यायला हवी होती, असे मतही त्यांनी व्यक्त केले. गावठाण आणि कोळीवाडय़ातील गावपण आणि संस्कृतीला कुठेही धक्का  लागू नये असे सांगत येथील घरे अधिकृत करण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच ग्रामस्थांच्या संमतीशिवाय या भागात ही योजना राबविली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 7, 2018 2:06 am

Web Title: cluster redevelopment tmc
Next Stories
1 दिव्यात रस्त्यालगत तळीरामांचे अड्डे
2 पालिकेचे सतर्कतेचे आवाहन
3 कचऱ्यातून सोने कमावण्याची संधी!
Just Now!
X