ठाणे जिल्ह्यात करोनाचा प्रसार वाढत असल्याचं दररोजच्या आकडेवारीतून दिसून येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठाणे जिल्ह्यातील सर्व पालिका आयुक्तांची व्हिडीओ कॉन्फरन्सिगद्वारे बैठक घेऊन आढावा घेतला व महत्वाच्या सूचना केल्या. त्याबरोबर ठाणे जिल्ह्यातील परिस्थिती चिंताजनक असल्याचंही त्यांनी बैठकीत नमूद केलं. “ठाणे जिल्ह्यात करोनाची वाढती साथ चिंताजनक आहे. मात्र कोरोनाची एकांगी लढाई लढू नका, आपापल्या शहरांतील नागरिकांना , स्वयंसेवी संस्थांना यात सहभागी करून घ्या, जेणे करून या साथीवर नियंत्रण मिळविणे सोपे जाईल,” असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले. मुख्यमंत्र्यांनी

मुख्यमंत्री यावेळी बोलताना म्हणाले की, “या तीन चार महिन्यांच्या लढाईत काय करावे आणि काय करू नये याविषयी सर्वांना पुरेशी माहिती झाली आहे. तसेच सर्व सूचना आणि निर्देश स्पष्ट असतात. याप्रमाणे सर्व आयुक्तांनी अधिक बारकाईने लक्ष घालून कारवाई केली, तर आपल्याला अपेक्षित यश मिळेल अशी मला खात्री आहे. यापूर्वीचे पालिकांतील काही अधिकारी बदलले कारण ते कार्यक्षम नव्हते असे नाही, पण आता करोनाची वाढ गुणाकारासारखी होते आहे. त्यामुळे आपल्याला खूप तातडीने पाउले उचलणे गरजेचे आहे. आपण पुढे काही करण्याचा आत दररोज रुग्ण संख्या झपाट्याने वाढताना दिसते आहे,” असं मुख्यमंत्री म्हणाले.

याप्रसंगी अजोय मेहता यांनीही सूचना केल्या. “ठाणे जिल्ह्यात करोनाची साथ झपाट्याने पसरत असून, हा केवळ राज्यासाठी नव्हे तर देशासाठी सुद्धा चिंतेचा विषय बनला आहे. रुग्णांचे जास्तीत जास्त संपर्क शोधणे, संस्थात्मक विलगीकरण वाढविणे, उद्योग व कंपन्यांच्या मदतीने त्यांच्या परिसरात चाचण्या करणे, उपचारांची सुविधा वाढविणे, नॉन कोव्हिड रुग्णांना वेळीच उपचार मिळावेत, सर्व पालिकांमध्ये समान प्रमाणात बेड्सचे नियोजन असावे. ऑक्सिजन सुविधा असलेले बेड्स वाढवावे, पावसाळा असल्याने सर्दी, तापाचे, खोकल्याचे रुग्ण यांना उपचार मिळण्याकडे लक्ष द्यावे,” अशा सूचना त्यांनी केल्या. यावेळी विविध पालिका आयुक्तांनी त्यांच्या क्षेत्रात करीत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.