मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला सुनावले

कल्याण : मंदिरे बंद असली तरी आरोग्य मंदिरे सुरू आहेत. धार्मिक स्थळे सुरू राहायला हवीत, हे ठीकच. ती टप्प्याटप्प्याने सुरू करू, पण सध्या आरोग्य मंदिरांची अधिक आवश्यकता आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंदिरे सुरू करण्यासाठी आंदोलन करणाऱ्या भाजपला मंगळवारी सुनावले. ‘भारतमाता की जय’ अशा घोषणा देताना भारतमातेच्या तळमळत असलेल्या मुलांना विसरून चालणार नाही, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी भाजपला लगावला.

कोपर उड्डाणपुलासह कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील विकासकामांचे ऑनलाइन उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मंगळवारी झाले. डोंबिवली येथे झालेल्या कार्यक्रमात सभास्थळी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, भाजप आमदार रवींद्र चव्हाण आदी उपस्थित होते. यावेळी आमदार चव्हाण यांनी मंदिरे सुरू करण्याची मागणी केली. तसेच मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरू होताच उपस्थित कार्यकर्त्यांनी ‘भारतमाता की जय’ अशी जोरदार घोषणाबाजी केली.

मुख्यमंत्र्यांनी हाच धागा पकडत मंदिराच्या मुद्दय़ावर भाजपला जोरदार प्रत्युत्तर दिले. सरकार येत्या काळात टप्प्याटप्प्याने मंदिरे उघडणार आहे, परंतु आज आरोग्य मंदिरांची अधिक आवश्यकता आहे. एखादे आरोग्य केंद्र बंद करून, त्याशेजारी मंदिर सुरू  करायचे का, असा सवालही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला. हिंदूुत्व सिद्ध करण्याची वेळ अजूनही आमच्यावर आलेली नाही. आम्ही ते अनेकदा कृतीतून सिद्ध केले आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

‘विकासासाठी केंद्र-राज्य सहकार्य हवे’

घोषणाबाजी, कुरघोडीच्या भावनेतून विकासकामे कधीच मार्गी लागत नाहीत. त्यासाठी केंद्र-राज्य सरकार यांचे एकत्रित सहकार्य आवश्यक आहे, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. केंद्राच्या माध्यमातून राज्याचे काही प्रश्न सुटले पाहिजेत. केंद्राचे काही प्रश्न राज्याच्या माध्यमातून सुटणारे आहेत. एकमेकांच्या संपर्कातून केंद्र, राज्य सरकारच्या माध्यमातून होणारी विकासकामे मार्गी लावली पाहिजेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले. राज्यातील काही रस्ते राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे देण्याची केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांची मागणी असेल तर त्यात आम्हाला आनंदच आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी देशातील रस्तेकामांबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे कौतुक केले.