कल्याण, टिटवाळा येथील सामान्य रुग्णालयांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

कल्याण :  रुग्णालयात एकही करोना रुग्ण दिसता कामा नये या दृष्टीने शासनस्तरावरून प्रयत्न सुरू आहेत. करोना टाळण्यासाठी रहिवाशांनी आता नेहमीच्या जीवनशैलीत बदल करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी सायंकाळी ऑनलाइनद्वारे कल्याण, टिटवाळा येथील सामान्य रुग्णालयांचे लोकार्पण करताना केले.

करोना रुग्णसंख्या घटत असली तरी येणाऱ्या काळात बेशिस्तपणा करून चालणार नाही. नियम पाळलेच पाहिजेत. फेरीवाला, दुकानदार, रिक्षाचालक, बसचालक यांची नियमित तपासणी करणे आवश्यक आहे. मुखपट्टी न घालणाऱ्यांना  दंड झालाच पाहिजे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. येणाऱ्या काळात जनजागृती हा मोठा भाग असणार आहे, असे ते म्हणाले. मागील आठ महिन्यांच्या काळात कल्याण-डोंबिवली पालिकेने करोना रुग्णांसाठी उपलब्ध करून दिलेल्या वैद्यकीय सुविधा, येथील डॉक्टर, कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाचे त्यांनी कौतुक केले.

पायाभूत सुविधांबरोबर अत्यावश्यक विकासकामे वेळीच होणे आवश्यक आहे. त्यासाठी निधीची गरज लागणार आहे. हा निधी कल्याण-डोंबिवली पालिकेला कमी पडू दिला जाणार नाही, असे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. करोना साथीत पालिकेकडे स्वत:च्या बाराशे खाटा (प्राणवायू) आणि २०० अतिदक्षता खाटांचे रुग्णालय तयार झाले आहे. आतापर्यंत २५ हजारांहून अधिक रुग्णांना मोफत उपचार देण्यात आले आहेत. करोनाचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज आहे, असे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले.