नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलिसांचा निर्णय

किशोर कोकणे, लोकसत्ता

ठाणे : नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर शहरातील नाक्यांवर मद्यपी वाहनचालकांची तपासणी करण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून विशेष मोहीम राबविण्यात येत असून या मोहिमेत आज, मंगळवारपासून मद्यपी वाहनचालकासोबत प्रवास करणाऱ्या सहप्रवाशावरही कारवाई करण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांनी घेतला आहे. मद्यपी चालक आणि त्याच्यासोबतच्या सह प्रवाशाला न्यायालयासमोर हजर करण्यात येणार असून न्यायालय त्यांना २ हजार रुपयांचा दंड किंवा सहा महिन्यांची शिक्षा सुनावू शकते, अशी माहिती वाहतूक पोलिसांनी दिली. त्यामुळे मद्यपी चालकांसोबतचा प्रवासही आता महागात पडण्याची चिन्हे आहेत.

ब्रिटनमध्ये करोनाचा नवा प्रकार आढळून आल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी रात्री ११ ते सकाळी ६ या वेळेत ठाणे शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यामुळे ठाणे तसेच आसपासच्या शहरातील सर्वच उपाहारगृह, मद्याची दुकाने रात्री ११ वाजेनंतर बंद राहणार आहेत. त्यामुळे अनेकांनी नववर्ष स्वागताच्या पाटर्य़ाचे घरामध्येच आयोजन करण्याचे बेत आखण्यास सुरुवात केली असून या पाटर्य़ानंतर काही जण बाहेर फिरायला निघू शकतात. त्यासाठी ते मद्याच्या नशेत वाहन चालविण्याचा प्रयत्नही करू शकतात. या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी आतापासूनच खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. मद्यपी चालकांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांनी २५ डिसेंबरपासून शहरात विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्यामध्ये आता मद्यपी वाहनचालकासोबत प्रवास करणाऱ्या सहप्रवाशावरही कारवाई करण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांनी घेतला आहे. आज, मंगळवारपासून ही कारवाई सुरू करण्यात येणार आहे. वाहतूक पोलिसांकडून आता ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात येत आहे. पोलीस मद्यपी वाहनचालकाविरोधात कारवाई करीत असून त्यासोबत त्याच्या वाहनामध्ये असलेल्या व्यक्तींवरही कारवाई करणार आहे. मोटार वाहन कायद्यानुसार वाहनचालकाला मद्य पिऊन वाहन चालविण्यास न रोखता त्यासोबत प्रवास केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करून प्रवास करणाऱ्या मद्यपी वाहनचालकांची आणि त्यांच्या मित्रांची झिंग पोलीस उतरविणार आहेत. या कारवाईत एखादा चालक आणि त्याचा सहकारी मद्याच्या नशेत आढळून आला तर त्यांचे वाहन पोलीस जप्त करणार आहेत. त्यानंतर संबंधित चालकाला आणि त्याच्या सहकाऱ्याला नोटीस बजावून न्यायालयात हजर राहण्यास सांगण्यात येणार आहे. त्यांना न्यायालय दोन हजार रुपये दंड किंवा सहा महिन्यांची शिक्षा देऊ शकते, अशी माहिती पोलिसांनी दिली.

‘‘रात्री संचारबंदी लागू असली तरी वाहतूक पोलिसांकडून सकाळी आणि रात्रीच्या वेळी मद्य तपासणी सुरू असणार आहे. एखादा वाहनचालक मद्याच्या नशेत वाहन चालवीत असेल तर, त्याच्यासोबत त्या वाहनातून प्रवास करणारे व्यक्तीही तितकेच दोषी असतात. त्यामुळे त्यांच्याविरोधातही आम्ही कारवाई करणार आहोत. नागरिकांनी मद्य पिऊन वाहने चालवू नये, असे आवाहन आम्ही नागरिकांना करत आहोत,’’ असे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.