डहाणूत समुद्र लाटांची किनाऱ्याला धडक; धूप प्रतिबंधक बंधारे जमीनदोस्त

उधाणांच्या लाटांच्या सततच्या माऱ्यामुळे हलक्या दगडांपासून बनवलेले धूप प्रतिबंधक बंधारे जमीनदोस्त झाले आहेत. समुद्र लाटा थेट किनाऱ्यावर धडकू लागल्याने किनारपट्टीच्या गावांना धोका निर्माण झाला आहे. डहाणूजवळील सतीपाडा, मांगेल आळी, कीर्तने बंगला, दुबळपाडा, गुराच्या दवाखान्याचा भाग, धाकटी डहाणू या भागांतील ही स्थिती आहे. त्यातच वाळू चोरीला अभय लाभल्याने किनारा आणखी खोल बनत चालला आहे. आगर, नरपड, दिवादांडी, चिखले, चिंचणी या भागांतही हीच परिस्थिती आहे.

डहाणू किनारपट्टीवरील गुरांचा दवाखाना ते नजीकच्या सतीपाडय़ाचे १०० मीटरचे तीन दगडी बंधारे जमीनोदस्त झाले आहेत. तर स्मशानभूमी ते दुबळपाडय़ापर्यंतचा ८०० मीटरच्या बंधाऱ्याचे दगड विस्कळीत झाल्याने भगदाड पडले आहे. त्यामुळे किनारपट्टीवरील धूप प्रतिबंधक बंधारा जमीनदोस्त झाला आहे.  त्यात वाळू चोरीकडेही महसूल खाते दुर्लक्ष करीत आहे. डहाणू औष्णिक  प्रकल्पासाठी केलेल्या भरावामुळे किनारपट्टीच्या गावांना पुराचा धोका वाढू लागला आहे. पूरक्षेत्रात पाणी पसरण्यास अडथळा निर्माण होऊन भरतीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे उलटय़ा दिशेने उधाणाच्या लाटा धडकून भरतीचे पाणी खाडी किनाऱ्यावरच्या गावात शिरत आहे. किनाऱ्यावरील सुरूची झाडेही उन्मळून पडली आहेत.

पक्क्या बांधकामाची मागणी

ग्रामस्थांच्या मागणीचा विचार न करता कमी वजनाच्या काळ्या दगडांचा वापर बंधाऱ्यासाठी करण्यात आला आहे. तर या दगडांसाठी दोरांची साखळी बांधण्यात आली होती.  मात्र उन्हामुळे तो दोर कुजल्याने दगड विस्कळीत झाले आहेत. पक्के बांधकाम करावे यासाठी वेळोवेळी मागणी करूनही दुर्लक्ष होत आहे.

पक्का बंधारा कधी

डहाणू आगवण येथे औष्णिक प्रकल्प उभारण्यासाठी १९८४ साली खाजण जमिनीत प्रकल्पाच्या भरावासाठी डहाणू किनाऱ्यावरील हजारो ब्रास सँडबार आणि रेतीचा उपसा करण्यात आला. त्यामुळे खोलगट भाग निर्माण झाला आहे. किनाऱ्याच्या गावांना संरक्षणाची जबाबदारी बीएसईएस औष्णिक विद्युत प्रकल्प आणि मेरिटाइम बोर्डाने उचलली. आणि स्मशानभूमी ते दुबळपाडा ८०० मीटर लांबीचा पक्का बंधारा बांधण्याची कबूल केले. यासाठी मेरिटाइम बोर्डाचे अधिकारी आणि तज्ज्ञांच्या पाहणीनंतर अंदाजे ३ कोटी ६५ लाख खर्च अपेक्षित होता. मात्र हा खर्च वाचवण्यासाठी कंपनी गुजरात राज्यातील उधवाडा येथील प्रतिबंधक बंधारा धरतीवर  १ बाय १ चे सिमेंट ब्लॉक टाकून ४० ते ५० लाखांचा बंधारा बांधण्याचा विचार केला. आणि १९९६ साली  ८०० मीटर लांबीचा धूप प्रतिबंधक बंधारा बांधून दिला आहे.

वाळूचे प्रकार रोखण्यासाठी स्वतंत्र दक्षता पथक नेमण्यात आले आहे. ज्या वेळी असे प्रकार आढळून येतात त्या वेळी कारवाई करण्यात येते.

– राहुल सारंग, तहसीलदार डहाणू

डहाणू किनाऱ्यावर उधाणाच्या लाटांच्या माऱ्यामुळे किनारा फुटून जमीनदोस्त झाला आहे. किनाऱ्यांची धूप रोखण्यासाठी सरकारकडून उपाययोजना केली जात नाही. राजरोस वाळू चोरी होत असल्याने किनारे खोल होऊ  लागले आहेत.

– धनेश आकरे, ग्रामस्थ