लोकसत्ता प्रतिनिधी
ठाणे : घोडबंदर येथील भाईंदरपाडा भागात गेल्या चार महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या तानाजी जावीर (४८) यांचा खून झाल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी कासारवडवली पोलिसांनी कल्पना नागलकर (४५), गीता आरोळकर (४५), संतोष घुगरे (३०) आणि मंगेश मुरुडकर (३५) यांना अटक केली आहे. संपत्तीच्या वादातून हा खून झाल्याची माहिती कासारवडवली पोलिसांनी दिली.
भाईंदरपाडा येथील नागलाबंदर परिसरात तानाजी जावीर हे राहात होते. याच परिसरात राहणाऱ्या कल्पना नागलकर यांच्याकडे ते गेल्या १२ वर्षांपासून कामाला होते. कल्पना नागलकर यांची परिसरात सात ते आठ घरे असून त्यांच्या दरमहिन्याचे भाडे वसुली तसेच कागदपत्रांच्या पूर्ततेचे काम तानाजी करत होते. मात्र १७ जुलैला ते अचानक बेपत्ता झाले. त्यांच्याशी संपर्क होत नसल्याने त्यांच्या भावाने २३ जुलैला याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात ते बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी तानाजी यांचा शोध घेण्यासाठी तीन पथकेही तयार केली होती. दरम्यान, तानाजी यांचा खून झाला असून यातील आरोपी कल्याण येथे लपून असल्याची माहिती मिळाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांच्या पथकाने कल्याण येथून संतोषला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता, त्याने गणेशच्या साथीने तानाजी यांचा खून केल्याची कबुली दिली. पोलिसांनी गणेशला ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीत त्याला खुनाची सुपारी गीता आरोळकर हिच्याकडून मिळाल्याचे समोर आले. पोलिसांनी गीतालाही ताब्यात घेतले. तिची चौकशी केली असता, कल्पनाने तिला तानाजी यांचा खून करण्याच्या बदल्यात १ लाख ४० हजार रुपये दिल्याचे उघड झाले. कल्पना हिच्या घरांपैकी काही घरे तानाजी स्वत:च्या नावावर करण्याचा प्रयत्न करीत होते. त्यामुळे त्यांच्या खुनाची सुपारी दिल्याचे कल्पना हिने सांगितले.
दारूमधून विषप्रयोग
नागलाबंदर येथे राहणाऱ्या गीताला कल्पनाने तानाजी यांच्या खुनाची सुपारी दिल्यानंतर तिने गणेश आणि संतोषला त्याची माहिती दिली. गणेश आणि संतोष हे तानाजी यांना ओळखत होते. त्यांनी १७ जुलैला तानाजी यांना दारू पिण्यासाठी गायमुख खाडीकिनारी एका निर्जनस्थळी बोलावले. तानाजी त्या ठिकाणी आल्यानंतर त्यांच्या दारूमध्ये गणेश आणि संतोषने विषारी औषध मिसळवले. तानाजी दारू प्यायल्यानंतर त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर गणेश आणि संतोष यांनी त्याचा मृतदेह निर्जनस्थळी फेकून दिला.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 27, 2020 2:29 am