जिल्हाधिकारी डॉ. अश्विनी जोशी यांचे महिला दिनी मत

परंपरेचे जोखड मनावर घेऊन वावरण्यापेक्षा त्यातून मुक्त व्हा. आपल्याला अष्टपैलू म्हणायला हवे, असे काही करायचा प्रयत्न करा. समाजात ज्या लोकांना आपली गरज आहे, त्यांच्यासाठी सक्षमपणे काम करा. प्रत्येक बाबतीत महिला हे बिरुद मागे लावून घेण्याचे कारण नाही, असे परखड मत ठाण्याच्या जिल्हाधिकारी डॉ. अश्विनी जोशी यांनी येथे मांडले.

डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त बँकेच्या महिला सभासद व ग्राहकांसाठी महिला मेळाव्याचे आयोजन मंगळवारी येथील सुयोग सभागृहात करण्यात आले होते. या वेळी डॉ. जोशी बोलत होत्या. याप्रसंगी संचालिका मेघना आंबेकर, नंदिनी कुलकर्णी, पेंढरकर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. माझ्याही नातेवाईकांना माझ्या लग्नाची आणि नोकरीची चिंता होती, परंतु माझे पालक माझ्या पाठीशी ठाम उभे होते. त्यांनी मुलगा-मुलगी असा भेदभाव कधी केला नाही, असे जोशी या वेळी म्हणाल्या.

नोकरी सांभाळताना संसाराची सर्व सूत्रे आपल्या हाती ठेवण्याचा अट्टहास पूर्वीच्या महिलांमध्ये जाणवत राहायचा. नोकरी करताना संसारातही आपण अव्वल असावे हा उद्देश कदाचित त्यामागे असावा. या अट्टहासामुळे त्यांची दमछाक होताना मी पाहिली आहे. परंपरांचे जोखड मनावर ठेवून दमछाक करून घेण्यापेक्षा मी त्या परंपरा बाजूला ठेवेन. लोकांनी मला अष्टपैलू म्हणावे, असा आग्रह धरून माझ्या पिढीच्या महिलांनीही या जबाबदारीने दबून जाण्याचे कारण नाही, असेही त्या म्हणाल्या. घरचे काम येत नसले तरी तुमच्या अंगी ज्या कार्यक्षमता आहेत त्या ओळखण्याची आवश्यकता आहे. समाजात आवश्यक तेथे सक्षमपणे काम करा. समाजातील महिलांविषयीचा जो दृष्टिकोन आहे तो नक्कीच बदलेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

आपण स्वत:मध्येच गुंतलो आहोत, महिला आहेत म्हणून अनेक मुली एमपीएससीची परीक्षा देताना पाहिल्या आहेत. परंतु दुसऱ्या राज्यात आपले कसे होईल यापेक्षा तुमच्यातील कार्यक्षमता जाणा आणि भारतीय प्रशासकीय सेवेच्या परीक्षाही द्या, असे आवाहनही त्यांनी केले. याप्रसंगी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या प्रतिभा भावे, डॉ. कीर्तीदा प्रधान, सुलभा धोंडे, ज्योती परब, अपर्णा कवी, रोहिणी काळे आदी महिलांचा सत्कार बँकेच्या वतीने करण्यात आला.