News Flash

प्रासंगिक : वस्तुसंग्रहालयाचे कोंदण हवे!

डॉ. अश्विनी जोशी यांनी शहरात वास्तुसंग्रहालय उभारण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.

ठाणे शहरात वास्तुसंग्रहालय

गेल्या काही महिन्यांपासून जिल्हा प्रशासनाच्या पुढाकाराने ठाण्याच्या सांस्कृतिक परंपरेला पूरक ठरतील असे उपक्रम राबविले जात आहेत. मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या टाऊन हॉल सभागृहाचे नूतनीकरण करून तो कला रसिकांना कलादालन म्हणून खुला करून देण्यात आला आहे. त्यालगत उभारण्यात आलेल्या खुल्या रंगमंचावर (अ‍ॅम्पी थिएटर) विविध सांस्कृतिक कार्यक्रम होऊ लागले आहेत. साकेतजवळ जैवविविधता उद्यान साकारले जात आहे. नुकतेच ठाणे परिसराच्या जनजीवनाची नेटकी सचित्र ओळख करून देणारे ‘कॉफीटेबल बुक’ जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रकाशित करण्यात आले. गेल्या महिन्यात कोकण इतिहास परिषदेच्या अधिवेशनात प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असलेल्या जिल्हाधिकारी डॉ. अश्विनी जोशी यांनी शहरात वास्तुसंग्रहालय उभारण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. यानिमित्ताने ठाणे शहराला वास्तुसंग्रहालय नेमके कशासाठी हवे, ते कसे असावे, याविषयी ज्येष्ठ प्राच्यविद्या अभ्यासक डॉ. दाऊद दळवी यांनी मांडलेले हे विचार..

ठाण्याला सुमारे अडीच हजार वर्षांची ऐतिहासिक व सांस्कृतिक परंपरा लाभली आहे. ठाण्याचे वैशिष्टय़ असे की, प्राचीन काळापासून येथे विविध धर्माचे, भाषेचे, पंथाचे व वंशाचे लोक शतकानुशतके गुण्यागोविंदाने राहत आहेत. त्यामुळे ठाणे शहर हे राष्ट्रीय एकात्मकतेचे उत्तम प्रतीक आहे. सातवाहन, शिलाहार, यादव या प्राचीन राजवटींनी ठाण्याच्या संस्कृतीत मोलाची भर घातली. शिलाहार काळात सुमारे ४०० वर्षे ठाणे हे राजधानीचे शहर होते. ठाणे काही काळ गुजरातच्या सुलतानाच्या अमलाखाली होते. १६ व्या शतकाच्या सुरुवातीला पोर्तुगीजांच्या आक्रमणामुळे ठाणे व परिसरातील संस्कृती उद्ध्वस्त झाली. पोर्तुगीजांनी ठाण्यातील व आजूबाजूला असलेली अनेक मंदिरे नष्ट केली. त्यातील सुंदर मूर्तीचा विध्वंस केला. त्याचे भग्नावशेष ठाणे व परिसरात इतस्तत: विखुरलेले आढळून येतात. पोर्तुगीजांनंतर मराठय़ांनी पुन्हा मराठमोळी संस्कृती व समाजरचना स्थापन केली. ठाण्यामध्ये प्राचीन व मध्ययुगीन तसेच मराठय़ांच्या काळातील काही इमारती व अवशेष अतिशय उपेक्षित अवस्थेत शिल्लक आहेत. प्राचीन मंदिरांचे भाग व मूर्तीशिल्प अजूनही काही ठाणेकरांच्या घरात दिसून येतात.
गेल्या १५ वर्षांत ठाण्याची प्रत्येक क्षेत्रात ‘न भूतो न भविष्यति’ अशी प्रगती झाली आहे. ठाणे शिक्षण, क्रीडा व कलेचे माहेरघर झाले आहे. गडकरी रंगायतन, दादाजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृह, नव्याने उघडलेले कलादालन यातून आधुनिकतेचा व प्रगतीचा स्पर्श जाणवतो. मात्र वास्तुसंग्रहालय नसणे ही ठाण्याची मोठी उणीव आहे. येथील परंपरा, ऐतिहासिक खुणा, दस्तऐवज, शिल्पशिळांचे जतन करण्यासाठी वस्तुसंग्रहालयाची नितांत आवश्यकता आहे. ठाणे शहराचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे येऊर परिसरात आदिवासींच्या वस्त्या आहेत. त्यामुळे आदिवासी संस्कृतीची ओळख ठाणेकरांना त्यांच्या चालीरीतीतून, वस्त्र-प्रावरणातून, नृत्यकला वादनातून व अलंकारातून होऊ शकते. नागरीकरणाच्या रेटय़ात कालांतराने हा मोठा वर्ग नष्ट होण्याची भीती आहे. आदिवासींबरोबरच वेगवेगळ्या कालखंडांतील वस्तू, प्राचीन व मध्ययुगीन नाणी, विविध प्रकारची शस्त्रे, आभूषणे सर्वत्र विखुरलेली आहेत. बऱ्याच लोकांच्या खासगी संग्रहात ऐतिहासिक कागदपत्रे, पोथ्या आहेत. अशा सर्व वस्तू ुसंग्रहालयात योग्य माहितीसह मांडल्यास ठाणेकरांना आपला प्राचीन सांस्कृतिक ठेवा पाहण्याची संधी मिळेल. शिलाहार काळातील महिषासुर मर्दिनी, श्रीधर, ब्रह्मा, गणपती यांची काही शिल्पे मुंबईच्या वस्तुसंग्रहालयात ठेवण्यात आली आहेत. ती शिल्पे पुन्हा मिळविता येतील. अथवा त्यांच्या प्रतिकृती ठाण्याच्या वस्तुसंग्रहालयात ठेवता येतील. शिलाहारकालीन अनेक शिलालेख व ताम्रपट विविध संस्था तसेच व्यक्तींकडे असण्याची शक्यता आहे. ते एकत्र आणल्यास निश्चितच ऐतिहासिक वारसा म्हणून त्याचा उपयोग होईल. ठाण्याच्या आजूबाजूच्या परिसरात कारिवली, लोनाड (भिवंडी), आटगांव (शहापूर), गुंजकटाई (वाडा) येथे मंदिराचे भग्नावशेष आहेत. वस्तुसंग्रहालयात ते नीट जतन करून ठेवता येतील.
ठाण्यातील शालेय विद्यार्थ्यांना वस्तुसंग्रहालयाच्या माध्यमातून शहराचा राजकीय व सांस्कृतिक इतिहास समजू शकेल. परदेशात स्थानिक इतिहासाला व वस्तुसंग्रहालयाला फार महत्त्व आहे. त्यामुळेच ठाण्याची सर्वागीण विकासाच्या दृष्टीने वस्तुसंग्रहालयाची नितांत आवश्यकता आहे. ठाणे परिसरात प्राचीन व मध्ययुगीन इतिहासाचे अनेक अभ्यासक राहतात. डॉ. सदाशिव गोरक्षकर, डॉ. अरुणचंद्र फाटक, डॉ. विजय बेडेकर, डॉ. अरुण जोशी, डॉ. श्रीनिवास साठे, सदाशिव टेटविलकर, वि. ह. भूमकर यांचा त्यात प्राधान्याने उल्लेख करावा लागेल. या मंडळींच्या मदतीने ठाण्यात वस्तुसंग्रहालय उभारता येऊ शकेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 13, 2016 4:03 am

Web Title: collector dr ashwini joshi promised to help to build museum in thane
टॅग : Museum
Next Stories
1 वेध विषयाचा : ‘प्रेमा’चा प्रवास एकांतातून गर्दीकडे..
2 प्रेमाच्या आकर्षक भेटवस्तूंचा बाजार
3 ठाण्यातील तरुणाई सज्ज..
Just Now!
X