‘दुर्गाडी’जवळ जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई; ५०हून अधिक वाळूमाफियांवर फौजदारी गुन्हे

कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्याजवळील खाडीकिनाऱ्यावर सुरू असलेल्या रेतीउपशावर धडक कारवाई करत जिल्हा प्रशासनाने बुधवारी सायंकाळपासून ५० हून अधिक रेतीमाफियांवर फौजदारी गुन्हे दाखल केले. हा परिसर कल्याण पट्टय़ातील रेतीमाफियांचा बालेकिल्ला मानला जात होता. त्यामुळे या ठिकाणी कारवाई करत जिल्हा प्रशासनाने मोठे यश मिळवले आहे. परंतु, इतके दिवस ठाणे जिल्ह्यातील रेतीउपसा अड्डय़ांवर कारवाई करणाऱ्या जिल्हा प्रशासनाला रेतीमाफियांचा हा ‘किल्ला’ आजवर का दिसला नव्हता, असा सवालही आता विचारण्यात येत आहे.

उल्हासनगर महापौर निवडणुकीच्या निमित्ताने या भागात आलेले जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी बुधवारी सायंकाळपासून ही कारवाई सुरू केली. गेल्या अनेक महिन्यांपासून या भागात बिनधोकपणे रेतीचा उपसा सुरू होता. अश्विनी जोशी यांच्या काळात त्यांनी जिल्ह्यातील रेती उपसा स्थळांविरोधात जोरदार मोहीम हाती घेतली होती. त्यांची बदली झाल्यानंतरही जिल्हा प्रशासनाने ही कारवाई सुरू ठेवली असली तरी जोशीबाईंनी निर्माण केलेला धाक विद्यमान प्रशासकीय प्रमुखांना निर्माण करता आला नव्हता. मुंब्रा, कल्याणच्या खाडीत दिवसाढवळ्या रेती उपसा सुरू असूनही महसूल विभागाचे अधिकारी डोळ्यावर पट्टी बांधून होते. रेती उपसा करणाऱ्या व्यावसायिकांविरोधात कारवाई करत मोठा दंड वसूल करत असल्याचे चित्र पद्धतशीरपणे रंगविले जात असले तरी प्रत्यक्षाहून प्रतििबब उत्कट असल्याचे जागोजागी पाहायला मिळत होते. अखेर उशिरा का होईना, जिल्हाधिकारी कल्याणकर यांनी स्वत कारवाई रेती उपसा करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्याचे चित्र बुधवारी आणि गुरुवारी पाहायला मिळाले.

बुधवारी सायंकाळपासून जिल्हाधिकारी डॉ. कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त जिल्हाधिकारी, तहसीलदार, तलाठी, मंडल अधिकारी असे महसूल विभागाचे शंभरहून अधिक कर्मचारी, २०० पोलिसांच्या बंदोबस्तात कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्याजवळील रेती बंदर खाडी किनारी उभ्या करण्यात येत असलेल्या रेती उपसा बोटींवर कारवाई सुरू करण्यात आली. गुरुवारी सकाळी ही कारवाई अधिक आक्रमक करण्यात आली. ३० पोकलेन, जेसीबीच्या साहाय्याने या बोटींचा चुराडा करून त्या खाडीत बुडविण्यात येत आहेत.

जहाजबांधणीचा आडोसा

जहाजबांधणीचा पूर्वपरंपार व्यवसाय दुर्गाडी किल्ल्याजवळील खाडी किनारी सुरू  आहे. खाडी किनारी जहाज बांधणीचा व्यवसाय सुरू आहे, असे दाखवून त्या ठिकाणी रेती उपसा करणाऱ्या बोटी, सक्शन पंप या जहाज बांधणीच्या गोदामात उभे करण्यात येत होते. संध्याकाळी सातनंतर ते पहाटेपर्यंत जहाज बांधणीच्या ठिकाणी आसरा घेऊन उभ्या असलेल्या बोटी काढायच्या आणि मुंब्रा, उंबर्डे, सापर्डे, कल्याण खाडी किनारा परिसरात रेती उपसा करून पुन्हा दिवसभर आराम करायचा अशी या माफियांची पद्धत होती.