नालासोपारा आणि वसई मतदारसंघांतून ९० हजार मतदार वगळण्याची शक्यता

अचूक आणि परिपूर्ण मतदारयाद्या तयार करण्यासाठी निवडणूक आयोगाने मोहीम हाती घेतली आहे. ज्या मतदारांची रंगीत छायाचित्रे जमा नसतील, त्यांनी २७ एप्रिलपर्यंत ती जमा न केल्यास त्यांची नावे मतदारयादीतून वगळण्यात येणार आहेत. वसई विधानसभा मतदारसंघ आणि नालासोपारा विधानसभा मतदारसंघातून तब्बल ९० हजारांहून अधिक मतदारांची रंगीत छायाचित्रे नसल्याने त्यांची नावे वगळण्याची शक्यता आहे. मात्र या निर्णयाबाबत जनजागृती करण्यात आली नसल्याने या निर्णयापासून मतदार अनभिज्ञ असल्याचे चित्र आहे.

सर्व विधानसभा मतदारसंघातील मतदारांच्या याद्या या रंगीत छायाचित्रांनी अद्ययावत करण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले होते. मतदारांनी आपापली रंगीत छायाचित्रे जमा करण्याच्या आदेश मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र छायाचित्रास सादर करण्याची माहिती मतदारांपर्यंत पोहोचू न शकल्याने मतदार याबाबत अनभिज्ञ आहेत. १५ एप्रिलपर्यंत ही मुदत होती. आता ही मुदत वाढवण्यात आली असून २७ एप्रिल ही शेवटची तारीख जाहीर करण्यात आली आहे.

१० जानेवारी २०१८ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. २८ एप्रिलपर्यंत मतदारांनी रंगीत छायाचित्रे सादर न केल्यास लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५० मधील नियम २२ नुसार संबंधित मतदारांची नावे वगळली जाणार आहेत.

वसई मतदारसंघ

  • एकूण मतदार : २ लाख ७३ हजार
  • छायाचित्रे नसलेले मतदार : ८ हजार ५००

नालासोपारा मतदारसंघ

  • एकूण मतदार : २ लाख
  • छायाचित्रे नसलेले मतदार : ७७ हजार ७८०

छायाचित्रे कुठे सादर करायची?

वसई विधानसभा मतदारसंघासाठी वसई तहसीलदार कार्यालयातील तळमजल्यावर साहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे कार्यालय आहे, तर नालासोपारा मतदारासंघाचे कार्यालय  बोळींज येथील पालिकेच्या प्रभाग समिती ‘अ’च्या कार्यालयात आहे.

मतदारांनी रंगीत छायाचित्रे २८ एप्रिलपूर्वी या कार्यालयात सादर करावीत. आम्ही २४ ते २६ ही विशेष मोहीम सुरू केल्याची माहिती वसईच्या निवासी नायब तहसीलदार (निवडणूक) पिंपळे यांनी दिली.

मीरा-भाईंदरमध्ये ५६ हजार मतदारांना फटका?

मीरा-भाईंदर शहरातील तब्बल ५६ हजार मतदारांची छायाचित्रे मतदारयादीत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या मतदारांनी आपली छायाचित्रे २७ एप्रिलपर्यंत निवडणूक कार्यालयात जमा केली नाहीत, तर त्यांची नावे मतदारयादीतून वगळण्यात येणार आहेत.

निवडणूक आयोगाने राज्यातील सर्वच विधानसभा मतदारसंघांच्या मतदारयाद्यांचे शुद्धीकरण करण्याची मोहीम हाती घेतली आहे. छायाचित्रे नसलेल्या मतदारांची छायाचित्रे गोळा करणे, कृष्णधवल छायाचित्रांच्या जागी रंगीत छायाचित्रे जमा करणे, सोळा अंकी मतदार ओळखपत्रांचे वाटप करणे, दुबार, मृत आणि स्थलांतरित झालेल्या मतदारांची नावे मतदारयादीतून वगळणे, मतदार यादीतील नावांची दुरुस्ती करणे ही कामे या मोहिमेंतर्गत करण्यात येणार आहेत. मतदारांना यासाठी नजीकच्या महापालिका प्रभाग कार्यालयात येत्या २७ एप्रिलपर्यंत संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. अन्यथा मतदारयादीत छायाचित्र नसलेल्या मतदारांची नावे पंचनामे करून वगळण्यात येतील असा इशारा निवडणूक आयोगाकडून देण्यात आला आहे.

मीरा-भाईंदर शहरात मीरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघ आणि ओवळा माजिवडा या मतदारसंघाचा अर्धा भाग येतो. यातील ओवळा माजीवडा मतदारसंघात मीरा-भाईंदरचे १ लाख ९३ हजार ३६५ मतदार आहेत. यातील २६ हजार २१७ मतदारांची छायाचित्रे मतदार यादीत नाहीत, शिवाय २ हजार ६९० मतदारांनी सोळा अंकी नवे ओळखपत्र द्यायचे आहे, तसेच १ हजार १५ मतदारांची कृष्णधवल छायाचित्रे बदलून ती रंगीत करायची आहेत. मीरा-भाईंदर मतदारसंघात एकंदर ३ लाख ७७ हजार २२६ मतदार असून यापैकी तब्बल ३० हजार मतदारांची छायाचित्रे मतदारयाद्यांमध्ये नाहीत.

नगरसेवकांना सहाकार्य करण्याचे आवाहन

जास्तीत जास्त मतदारांना आपली छायाचित्रे जमा करावीत यासाठी नगरसेवकांना याबाबतची माहिती मंगळवारी देण्यात आली. मतदारांना याची माहिती देण्यासाठी मतदान केंद्र अधिकारी घरोघरी जात आहेत. मात्र तरीही नगरसेवकांनीही या कार्यात सहकार्य करावे, असे आवाहन निवडणूक अधिकाऱ्यांनी या वेळी केले.