X

दिवाळीनिमित्त ठाणे शहराची रंगरंगोटी

ठाणे शहरातील रस्त्याचे दुभाजक पाण्याने धुऊन स्वच्छ केले जात आहेत.

‘ब्रँड ठाणे’च्या पिवळा, पानेरी निळा, हिरव्या रंगांत शहर उजळणार

ठाणे, कळवा तसेच मुंब्रा या शहरातील सर्वच रस्ते दिवाळी सणापूर्वी खड्डेमुक्त करण्यासाठी महापालिका प्रशासनाने मोहीम हाती घेतली असतानाच आता या मोहिमेंतर्गत शहरातील रस्त्यांचे दुभाजक व पदपथांना रंगरंगोटी करण्याची कामेही हाती घेतली आहेत. ‘ब्रँड ठाणे’च्या रंगाने पदपथ आणि दुभाजक रंगविले जात असून या कामासाठी ठेकेदार, बिल्डर आणि व्यावसायिकांची मदत घेतली जात आहे. या उपक्रमामुळे यंदा दिवाळी सणाच्या काळात संपूर्ण शहर ‘ब्रँड ठाणे’च्या पिवळा, पानेरी निळा, हिरवा अशा तीन रंगांनी शहर उजळून निघण्याची चिन्हे आहेत.

ठाणे महापालिका क्षेत्रातील अनेक रस्त्यांवर पावसामुळे खड्डे पडल्याने नागरिकांना त्यातून प्रवास करावा लागत आहे. गेल्या आठवडय़ात महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन शहरातील सर्व खड्डे बुजवण्याचे आदेश दिले. तसेच शहरातील विविध ठिकाणे ‘ब्रँड ठाणे’च्या रंगांत रंगवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या होत्या. त्यानुसार महापालिकेचे शहर अभियंता अनिल पाटील यांच्यासह ११० अभियंत्यांचा चमू रस्त्यावर उतरला असून त्यांनी शहरातील खड्डे बुजविण्याची कामे युद्धपातळीवर सुरू केली आहेत. त्यामध्ये ठाणे महापालिका क्षेत्रातील १४१ किलो मीटरचे ९८ रस्ते आणि २२ चौकामधील सुमारे १७०० खड्डे बुजविण्यात येत आहेत, अशी माहीती पालिका सूत्रांनी दिली. त्याचबरोबर शहरातील विविध झाडांनीही गेरूचा मुलामा दिला जात आहे.

ठाणे शहरातील रस्त्याचे दुभाजक पाण्याने धुऊन स्वच्छ केले जात आहेत. तसेच दुभाजकांना ‘ब्रँड ठाणे’च्या पिवळा, पानेरी निळा, हिरवा अशा तीन रंगांनी रंगविले जात आहे. याशिवाय, रस्त्यालगतच्या पदपथांनाही याच रंगांनी रंगविले जात आहे. ठाणे, कळवा, मुंब्रा या तिन्ही शहरांत एकाच वेळी ही सर्व कामे सुरूकरण्यात आली आहेत. विशेष म्हणजे, या कामासाठी ठेकेदार, बिल्डर आणि व्यावसायिकांची मदत घेतली जात असल्याने त्यासाठी महापालिकेला एक रुपयाही खर्च होणार नाही. आपले शहर या भावनेतून या उपक्रमामध्ये ठेकेदार, बिल्डर आणि व्यावसायिक हे सहभागी झाले आहेत. दिवाळीपूर्वी ही कामे उरकली जाणार असून त्यामुळे शहर दिवाळीत रंगांनी उजळून निघणार आहे, अशी माहिती महापालिकेचे शहर अभियंता अनिल पाटील यांनी दिली.

२२ सेल्फी पॉइंट

यंदा दिवाळी सणांच्या पाश्र्वभूमीवर शहरातील विविध भागांत सेल्फी पाइंट तयार करण्याचा विचार महापालिका प्रशासनाने सुरूकेला असून त्यासाठी शहरातील २२ ठिकाणांची पाहणीही अधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे. ब्रँड ठाणेच्या रंगांचा वापर करून हे सेल्फी पाइंट उभारले जाणार आहेत. त्यामुळे यंदाच्या दिवाळी ‘बँड्र ठाणे’च्या रंगांनी साजरी होणार असल्याची चिन्हे आहेत.

Outbrain